पुणे – लोणी काळभोर पोलिसांनी घरफोडीतील सराईत गुन्हेगारांकडुन 14 लाख 50 हजाराचे 28 तोळे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे. आरोपींनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. राजु कुंडलिक म्हेत्रे (26, लोणी काळभोर,, मुळ . निलंगा, लातुर ) दस्तगीर बासु शेख (29, रा., लोणी काळभोर ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकातील अंमलदार अमित सांळुके व निखील पवार कदमवाकवस्ती गस्त घालत असताना त्यांना म दोन व्यक्ती संशयास्पदरित्या लोणी स्टेशन परिसरात दुचाकीवरुन फिरत असल्याची खबर मिळाली. त्यानूसार तपास पथकाने लोणी स्टेशन येथे सापळा रचुन दोघांनाही थांबण्याचा इशारा दिला. मात्र ते दुचाकी सायकल न थांबवता पोलीसांना चकवा देत भरधाव वेगात पुढे निघुन गेले.
तपास पथकाने त्यांचा मोठया शिताफीने पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांना ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण 10 गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन 14 लाख रु किंमतीचे 28 तोळे सोन्याचे दागिने व मोटर सायकल असा एकुण 14 लाख 50 हजार रु चा माल हस्तगत करुन जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपी राजु म्हेत्रे हा लातुर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यास यापुर्वी देखील घरफोडीचे गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेले आहे.
उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, सुनिल शिंदे, अमित सांळुखे, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देवीकर, राजेश दराडे, दिगंबर साळुके, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे यांचे पथकाने केली आहे.