नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याप्रकरणी भाजपा नेते तेजिंदरपाल बग्गा यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर काल रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.दरम्यान, या सुटकेनंतर बग्गा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी मी ही लढाई अशीच सुरु ठेवणार असून थांबणार नसल्याचे म्हटले आहे.
पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर तेजिंदरपाल सिंग बग्गा रात्री उशिरा घरी पोहोचले. भाजपा नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून आप आणि भाजपा यांच्यात चांगलेच युद्ध रंगले होते. बग्गा हे भाजपाच्या युवा शाखेचे नेते आहेत आणि पक्षाचे दिल्ली प्रवक्तेही आहेत.
मुख्यमंत्र्यांना धमकावल्याप्रकणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या दिल्ली पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. बग्गा यांना अटक केल्यानंतर मोहालीला घेऊन जाणाऱ्या पंजाब पोलिसांच्या पथकाला हरियाणातच थांबवण्यात आले. बग्गा यांनी त्यांच्या अलीकडील टिप्पण्यांमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचाही समाचार घेतला होता. रात्री उशिरा बग्गा घरी पोहोचताच दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश कुमार गुप्ता यांनी ट्विट करून त्यांच्या ‘घर वापसी’चे कौतुक केले.
Delhi Police produces Tejinder Pal Singh Bagga at magistrate's residence in Gurugram
Read @ANI Story | https://t.co/KwIuuTFrgF
#TejinderBagga #TejinderBaggaDetained pic.twitter.com/GVSM7Ac8gA— ANI Digital (@ani_digital) May 6, 2022
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, दिल्लीला घरी परतल्यानंतर, भाजपा नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांना आव्हान दिले आहे. आपण पुढे कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहेत, असा इशारा बग्गा यांनी दिला आहे. “मी केजरीवालांना आव्हान देतो की त्यांना वाटत असेल तर आम्ही प्रश्न विचारणे बंद करू आणि आवाज उठवणे थांबवू. मी ही लढाई लढणार आहे. मी थांबणार नाही. मी अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारत राहीन,” असे बग्गा यांनी म्हटले आहे.
मी यापूर्वीच जारी केलेल्या सर्व समन्सना उत्तर दिले आहे, असे बग्गा म्हणाले. तर पंजाब पोलिसांनी बग्गा यांना तपासात अनेक वेळा सामील होण्यास सांगितले होते परंतु त्याचे पालन करण्यास नकार दिला, असा दावा केला.दिल्लीतील निवासस्थानी बग्गा यांना अटक करणाऱ्या पंजाब पोलिसांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हरियाणा पोलिसांनी बग्गा यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे बग्गा मोहालीला न जाता दिल्लीला परत आले.
भाजपाचे आक्रमक नेते तेजिंदरपाल बग्गा यांना अटक केल्यानंतर पंजाब पोलिसांचा ताफा मोहोली जिल्ह्याकडे रवाना झाला. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता हा ताफा कुरुक्षेत्रमध्ये आल्यावर हरियाणा पोलिसांनी त्यांना घेराव घातला. याविरोधात पंजाब पोलिसांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली पण, न्यायालयाने बग्गा यांना हरियाणाच्या हद्दीत ठेवण्याची विनंती नाकारली व सुनावणी शनिवापर्यंत तहकूब केली.