नेवासा -तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे सनातन वैदिक हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळा संत-महंतांच्या उपस्थितीत व वेदमंत्राच्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हभप कृष्णा महाराज मते यांचे यापुढे महंतप्रकाशानंदगिरी महाराज असे नामकरण झाले. महंत भास्करगिरी महाराज यांनी हे जाहीर केले.
यावेळी यज्ञ मंडपामध्ये होम हवन, नामकरण विधी वेदमंत्राच्या जयघोषात पार पडला. धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य त्रिंबकेश्वर येथील शास्त्री महाराज गुरुजी, वेदशास्त्रसंपन्न आचार्य गणेश कुलकर्णी यांच्यासह उपस्थित ब्रम्हवृंदांनी केले. उपस्थित संत-महंतांची भक्त निवासापासून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर या संत-महंतांच्या उपस्थितीत कृष्णा महाराज मते यांना संन्यास दीक्षा देण्यात आली.
उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षाप्रसंगी कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मंजूर येथील श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर महाराष्ट्र पिठाधीश्वर शिवानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील महंत देवेंद्रगिरी महाराज, महंत वेदव्यासपुरी महाराज, गिरनार मंडलाचे अध्यक्ष महंत इंद्रजीत भारती महाराज, महंत इंद्रभारती महाराज, महंत विश्वंभर गिरी महाराज, महंत हरिहरानंद महाराज, महंत कृष्णागिरी महाराज, आनंद चैतन्य महाराज, शांतीब्रह्म मारुतीबाबा कुऱ्हेकर, हभप मुखेकर शास्त्री, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख, हभप उद्धव महाराज मंडलिक, महंत सुनिलगिरी महाराज, महंत गोपालानंदगिरी महाराज आदी उपस्थित होते.
कृष्णा महाराज मते उर्फ महंत प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले, की धर्माची वैश्विक जबाबदारी गुरुवर्य बाबांनी आमच्यावर टाकलेली आहे. बाबांनी आम्हाला उत्तराधिकारी बनवले मात्र उत्तर सेवेकरी म्हणून काम करणार आहे. भक्तीने ओतप्रोत असे देवगड संस्थान आहे हे संस्थान आपण निरपेक्ष वृत्तीने व श्रद्धेने चालवू यासाठी सर्वांच्या प्रेमाची व सहकार्याची आम्हाला गरज असून ती साथ आम्हाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वेदव्यासमुनी महाराज, महंत शिवानंदगिरी महाराज यांनी शुभाशिर्वाद दिले. देश व राज्यभरातून आलेल्या संतांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन संतसेवक बजरंग विधाते यांनी केले. तर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डीले, पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग विधाते यांनी केले. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.