नवी दिल्ली – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील खेळाडूंना त्यांच्या राज्यात प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले आहे. त्यांचा मुलगा आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी या संबंधात त्यांच्यासाठी सर्व सुविधांचे आश्वासन दिले आहे. स्टॅलिन यांनी मणिपुरातील खेळाडूंना हे जे निमंत्रण दिले आहे त्यावर भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले, की तामिळनाडू सरकार आता झोपेतून जागे झाले आहे. ते या प्रकरणात राजकारण करीत आहे.
एका निवेदनात स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, खेलो इंडिया आणि आशियाई खेळांसारख्या स्पर्धांसाठी मणिपूरमधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी तेथील परिस्थिती सध्या अनुकूल नाही. मी युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना तामिळनाडूमध्ये मणिपूरच्या खेळाडूंसाठी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. उदयनिधी यांनीही क्रीडा विभागाच्या वतीने उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
तमिळनाडू 2024च्या खेलो इंडिया गेम्सचे यजमानपद भूषवणार आहे. मणिपूर हे “चॅम्पियन्स, विशेषत: महिला चॅम्पियन’ तयार करण्यासाठी ओळखले जाते. पण त्या राज्यात अत्यंत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा तेथील खेळाडुंच्या प्रशिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
तमिळ संस्कृती ही प्रेमाने आणि काळजीने वागणाऱ्यांची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले. मणिपुरातील जे खेळाडू याचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मोबाईल क्रमांकही त्यांनी जारी केला आहे. तसेच स्वतंत्र इमेल आयडीही त्यांनी सुरू केला आहे.