नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने आज पाच फरारी गुन्हेगारांच्या शोधासाठी तमिळनाडूमध्ये तब्बल 21 ठिकाणी छापे घातले. “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून जबरदस्तीने धर्मांतर केले जाण्याला विरोध केल्याबद्दल रामलिंगम यांच्या हत्येमागील “पीएफआय’च्या कारस्थानाच्या तपासासंदर्भात हे छापे घालण्यात आले.
“पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या काही पदाधिकाऱ्यांशी संबंधित काही ठिकाणांबरोबर “एसडीपीय’चा प्रदेशाध्यक्ष नेल्लाई मुबारकशी संबंधित ठिकाणांवरही छापे घालण्यात आले. तंजावूर, मदुराई, तिरुनेवेली, तिरुपूर, विल्लूपुरम, त्रिची, पुदुकोत्ताई, कोईम्बतूर, आणि मायिलादुथुराई या जिल्ह्यांमध्ये हे छापे घालण्यात आले आणि काही डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.
“एनआयए’ने पाच फरारी व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्याला प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यापूर्वी अटक केलेल्यांवरील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पाच फरारी आरोपींसह एकूण 18 जणांवर “एनआयए’ने 2 ऑगस्ट 2019 रोजी विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले आहे. “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या धर्मांतराला रामलिंगम यांनी विरोध केला होता. त्यांची 2019 मध्ये हत्या करण्यात आली होती.