पंचमहाल – वर्ष 2002च्या गोध्रा ट्रेन हत्याकांडातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फरार दोषी कैद्याला गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. एक वर्षापासून तो फरार होता. एका घरगुती कार्यक्रमासाठी त्याला पॅरोल मंजूर झाला होता. मात्र नंतर तो कारागृहात परतलाच नव्हता.
पंचमहाल पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पॅरोल फर्लो पथक शनिवारी लिमखेडा येथे पोहोचत फरार सत्तारवर अटकेची कारवाई केली. त्याला शहर बी विभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आता त्याला त्याची उर्वरित शिक्षा पूर्ण करण्यासाठी अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहात नेले जाईल.
27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचे दोन डबे पेटवल्याप्रकरणी सत्तारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेमध्ये 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता आणि राज्यात जातीय दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत 1,200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. सत्तारला मार्च 2002 मध्ये अटक करण्यात आली होती.