गॅसच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक वेळापत्रक कोलमडले
मंचर – घरगुती गॅसच्या बाजारभावात अचानकपणे केंद्र सरकारने मोठी वाढ केल्याने गृहिणींचे आर्थिक वेळापत्रक कोलमडले आहे. तब्बल 145 रुपये टाकीमागे ग्राहकांना जादा मोजावे लागणार आहे, या निर्णयामुळे मंचर परिसरातील गॅस टाक्यांचेही भाव वाढले. मात्र, पूर्व सूचना न देता ही भाववाढ केली गेली असल्याने शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
आंबेगाव तालुक्यात एचपी गॅस, इण्डेन गॅस, भारत गॅस कंपनीचे अंदाजे 40 ते 45 हजार ग्राहक आहेत. या कंपनीच्या डिलरच्या वतीने घरगुती ग्राहकांना गावात भरलेल्या गॅसच्या टाक्या पोहच करत असतात. 14.2 किलो वजनाची भरलेली गॅस टाकी मंगळवार (दि. 11) पर्यंत 705 रुपयाला मिळत होती; परंतु बुधवारी (दि. 12) एचपी गॅस कंपनीने पूर्वसुचना न देता अचानक 145 रुपये बाजारभाव वाढविले, त्यामुळे शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार 850 रुपयाच्या टाकीमध्ये 281 रुपये अनुदान मिळणार आहे; परंतु अनेक गॅस ग्राहकांच्या बॅंक खात्यात सबसिडी जमा होत नाही, त्यामुळे गॅस धारकांना 850 रुपये देऊन गॅस टाकी घ्यावी लागणार असल्याने मजुरीने काम करणाऱ्या महिलांना प्रपंचाचा गाडा ओढताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे बुधवारी एचपी गॅसच्या भरलेल्या टाक्यांची गाडी आल्यानंतर एचपी गॅस डिलरने ग्राहकाकडे 850 रुपयांची मागणी केल्यानंतर ग्राहक आणि गॅस डिलर यांच्यात शाब्दिक चकमक झाली, तसेच गृहिणींनी गॅस दरात केंद्र सरकारने केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी केली.