कराड – कराड जनता सहकारी बॅंकेने एकाच कर्जदाराला तब्बल 181 कोटींचे कर्ज विनातारण दिल्याची धक्कादायक माहिती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार डुबल यांनी ठेवीदारांसमोर दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी अध्यक्ष राजेश पाटील- वाठारकर यांच्यासह संचालकांच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत बॅंकेत घुसून बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ठेवीदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे जनता बॅंकेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण बनले होते.
दरम्यान, दि. 24 फेबुवारीपर्यंत सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवींबाबत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी यावेळी दिला.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ठेवीदारांचे कष्टाचे पैसे कराड जनता बॅंकेत अडकल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
हक्काचे पैसे मिळवण्यासाठी ठेवीदारांनी बॅंकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक ठेवीदार कराड जनता बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर एकत्र आले. त्यांनी बॅंकेच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आंदोलनकर्त्या ठेवीदारांशी संवाद साधण्याकरता एकही अधिकारी, कर्मचारी न आल्याने ठेवीदार प्रचंड आक्रमक झाले.
ठेवीदारांचा आक्रमकपणा पाहून त्यांच्या संवाद साधण्यासाठी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार डुबल बाहेर आले. यावेळी ठेवीदारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ठेवीदारांच्या प्रश्नांसमोर त्यांची बोलती बंद झाली. बॅंकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डुबल यांनी मोठ्या रकमांच्या कर्जांची माहिती दिली. यामध्ये एका ग्रुपला दिलेल्या 181 कोटींच्या कर्जाला काहीही तारण घेतले नसल्याची माहिती डुबल यांनी दिली. त्यांच्या या माहितीने ठेवीदार अधिकच आक्रमक झाले.
त्यांनी बॅंकेच्या कारभाराविरोधात आणि अध्यक्ष राजेश पाटील- वाठारकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत थेट बॅंकेवर चाल करून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी एकच गदारोळ उडाला. मुख्यालयातील शाखेतून सर्व ठेवीदारांनी दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळवला. यावेळी कर्मचारी अधिकाऱ्यांची पुरती तंतरली होती. ठेवीदारांचा आक्रमकपणा पाहून कर्मचारी व अधिकारी वाट मिळेल त्या दिशेने पळत होते.
बॅंकेची चौकशी “ईडी’मार्फत करा
कराड जनता बॅंकेने ठेवीदारांची चेष्टा चालवली आहे. आयुष्यभर ज्यांनी कष्ट करून पैसे विश्वासाने बॅंकेत ठेवले. त्यांचा विश्वासघात बॅंकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळाने केला आहे. बोगस कर्जप्रकरणे देऊन सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारला आहे, याची चौकशी झाली पाहिजे. 181 कोटींच्या कर्जाला काहीच तारण नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगत आहेत. हा प्रचंड मोठा आर्थिक भ्रष्टाचार आहे. याची “ईडी’मार्फत चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली.