काबुल: एकीकडे तालिबानने अमेरिकेबरोबर शांतता करार अंतिम टप्प्यात आला आहे असे मान्य केले असतानाच या गनिमांनी आज कुंदुज शहरावर मोठा हल्ला चढवला असल्याचे वृत्त आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील जवळपास निम्म्या प्रांतावर पुन्हा कब्जा केला असल्याचे वृत्त आहे. विदेशी सैनिक या भूमीवरून त्वरीत परत जावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तशातच ते अफगाणी सैन्यांवरही मोठ्या प्रमाणावर हल्ले करीत आहेत.
दरम्यान काबुलच्या दिशेनेही पुन्हा तालिबानी गनिमांनी कुच केल्याच्या बातम्या आहेत. तथापी या संबंधात बोलताना अफगाणि अध्यक्षांचे प्रवक्ते सेदिक सेदिक्की यांनी सांगितले की गनिमांचा मुकाबला सरकारी फौजांकडून सुरू आहे. त्यांना आम्ही कुंदुज मधून मागे रेटण्यात बरेच यशस्वी झालो आहोत. कुंदुज शहरातील मुख्य रूग्णालयावर तालिबानींचा ताबा आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर जखमी दाखल करण्यात आले आहेत. या संघर्षात मोठ्या प्रमाणावर जीवित हानीही झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचा नेमका आकडा मात्र समजू शकलेला नाही.
आक्रमक तालिबान्यांच्या विरोधात आम्ही कठोर लष्करी कारवाई करू शकतो पण त्यात सामान्य नागरीकांचीही जीवीत हानी होण्याची शक्यता असल्याने आम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते रोहुल्ला अहमदजाई यांनी सांगितले. या गनिमांवर अफगाणि फौजांनी हवाई हल्ला केला त्यात 26 तालिबानी गनिम मारले गेले आहेत. मात्र या हल्ल्यात काही प्रमाणात सामान्य नागरीकही ठार झाले आहेत त्याचा आकडा मात्र लष्कराकडून देण्यात आलेला नाही.