उद्यापासून बदलतील या दहा गोष्टी…

नवी दिल्ली: नव्या केंद्रिय अर्थसंकल्पातील तरतुदी आणि नव्याने संमत करण्यात आलेल्या कायद्यांच्या अनुषंगाने त्या सुधारणांची अंमलबजावणी उद्या दि. 1 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे आता इतके दिवस वृत्तपत्रांतून वाचल्या गेलेल्या अथवा दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये पाहिलेल्या या सुधारणा प्रत्यक्षात येणार आहेत. त्याविषयी एक महत्त्वाची नोंद आपण इथे घेऊया…

1. प्राप्तीकर विवरण –
तुम्ही तुमचे प्राप्तीकर विवरण 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत भरले असणे आवश्‍यक आहे. याबाबत जर तुमच्याकडून चालढकल झाली असेल, तर तुम्हाला आता रु. 10 हजार इतका दंड होऊ शकतो. इतकेच नव्हे तर, मागील आर्थिक वर्षातील तोटा आता तुम्हाला या आर्थिक वर्षात “कॅरी फॉरवर्ड’ करता येणार नाही. शिवाय, प्राप्तीकर विभागाकडून मिळणाऱ्या परताव्यावरील (रिटर्न्स) व्याजावरही तुम्हाला पाणी सोडावे लागणार आहे. केंद्रिय अर्थसंकल्पात मांडल्या गेलेल्या प्राप्तीकरविषयक नव्या तरतुदी कदाचित तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे इथून पुढचे सर्व व्यवहार तुम्हाला काळजीपूर्वक करावे लागणार आहेत.

2. घर घेणार असाल तर…
आता कोणत्याही गृह प्रकल्पात तुम्ही घर घेणार असाल तर टॅक्‍स डिडक्‍शन ऍट सोअर्स (टीडीएस) साठी तुम्हाला जास्तीची रक्कम मोजावी लागणार आहे. सोसायटीची क्‍ल्ब मेंबरशिप, कार पार्किंग अशा सुविधांसाठी द्यावी लागणारी रक्कम ही फ्लॅटच्याच किंमतीत धरली जाणार आहे. त्यामुळे टीडीएसमध्ये वाढ होणार आहे.

3. मोठी रक्कम बॅंकेतून काढल्यास…
तुम्ही एका वर्षाच्या काळात तुमच्या खात्यामधून एक कोटी अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढली, तर त्या रकमेवर आता अतिरिक्त 2 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे.

4. विमा रक्कम करपात्र असेल तर…
तुम्ही उतरवलेल्या जीवनविम्याची मुदत संपली आणि तुम्हाला मिळणारी रक्कम (मॅच्युरिटी व्हॅल्यू) हे करपात्र उत्पन्न असेल, तर त्यावर 5 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे.

5. रेल्वे बुकींगमध्ये सेवा कर –
आता आपण रेल्वे तिकिट बुकींग करणार असाल तर त्यासाठी सेवा कर द्यावा लागणार आहे. त्यामध्ये साध्या ट्रेनसाठी 15 रुपये आणि वातानुकुलीत ट्रेनसाठी 30 रुपये प्रतितिकिट द्यावे लागणार आहेत.

6. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास…
नव्या मोटर व्हेईकल्स ऍक्‍टनुसार सर्वच वाहतूक विषयक नियमांच्या उल्लंघनावरील दंडाची रक्कम पाच ते दहा पट इतकी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सिग्नल तोडणे, वाहनाची कागदपत्रे न बाळगणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे किंवा दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालता वाहन चालवणे यासाठी जबरी दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

7. शॉपिंगला गेल्यास…
आजवर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्ती खरेदी अथवा व्यवहार केल्यास त्याची माहिती तुमच्या बॅंकेने प्राप्तीकर विभागाला कळवणे बंधनकारक होते. आता ही 50 हजार रुपयांची मर्यादा हटवण्यात आली असून, कोणत्याही छोट्या व्यवहाराबाबतची माहितीही प्राप्ती कर विभाग तुमच्या बॅंकेला विचारु शकते. ही माहिती देणे बॅंकांना बंधनकारक असेल.

8. प्रलंबित करविषयक वाद असेल तर…
केंद्रिय सीमा शुल्क अथवा सेवा कराविषयक काही वाद न्यायप्रविष्ट असतील, तर त्यावर सामोपचाराने तोडगा काढून हे सर्व करविषयक विवाद संपुष्टात आणण्यासाठी स्वेच्छा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याद्वारे जुने सर्व करविवाद संपुष्टात आणले जातील.

9. पॅन- आधार लिंक नसेल तर…
तुम्ही प्राप्तीकर खात्याकडून देण्यात आलेले पर्मनन्ट अकौंट नंबर (पॅन) कार्ड जर आपण आपल्या “आधार’ कार्डशी संलग्न केले नसेल, तर अशा सर्वांना प्राप्तीकर विभागाकडून नवीन पॅनकार्डस दिली जातील.

10. 50 लाखांपेक्षा अधिक खर्च केल्यास…
तुमच्या घराचे नूतनीकरण अथवा शाही विवाह समारंभ अथवा अशा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही एका वर्षात 50 लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल, तर त्या खर्चावर आता 5 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×