भाजपच्या आमदारांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांना महापालिकेत झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलीस आयुक्त संदीप विष्णोई यांच्याकडे केली आहे.
मडिगेरी यांना शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर या तिघांनी मारहाण करून चार दिवस उलटले आहेत. याप्रकरणी मडिगेरी यांनी पोलिसांना जबाब दिलेला आहे. मग पोलीस कडक कायदेशीर कारवाई का करत नाहीत?, असा सवाल आमदार लांडगे आणि जगताप यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
मडिगेरी यांनी महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदासारखे महत्त्वाचे पद भूषविले आहे. अशा व्यक्तीला झालेली मारहाण शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या मारहाणीबाबत शहराच्या महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लांढे यांनीही पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांची भेट घेऊन मडिगेरी यांना मारहाण करणाऱ्या नगरसेवकांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी यापूर्वीच केली आहे.