पुणे -गर्भात मुली मारण्याची क्रूरता आजही पुरोगामी महाराष्ट्रात असून, पुणे जिल्ह्यातील नीरा येथे एक घटना नुकतीच उघडकीस आली. बीड, सांगली जिल्ह्यातही अशा घटना उघडकीस आल्या असून, संबधितांवर तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांना दिले आहेत.
याबाबत स्त्री आधार केंद्राच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. दिगंबर कनकुले यांना निवेदन दिले. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे आणि अपूर्वा गोंधळेकर उपस्थित होत्या.
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील गर्भवती महिलेने सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रशासनाने शासनाच्या सर्व संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी पथके तयार करून धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पथकामार्फत सोनोग्राफी सेंटर्सनी बंधनकारकरित्या भरून घेण्यात येणारा फॉर्म भरला आहे, की याची खात्री करून घ्यावी. सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयात असे कृत्य करणाऱ्या डॉक्टर, हॉस्पिटल आणि दवाखाने यांच्यासंबंधी माहिती देणाऱ्यांसाठी निशुल्क फोन सेवा-सुविधा सुरू कराव्यात. आलेल्या सर्व तक्रारीची प्राथमिक चौकशी नियमितपणे करून अहवाल प्रसिद्ध करावा.