पुणे -वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शहरातील दोन्ही पालखी मार्गावर आपत्कालीन कक्षांची संख्या वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी पालिका प्रशासनास दिले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 12 ते 14 जून या कालावधीत पुणे मुक्कामी असणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दोन्ही पालखी मार्गांची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, रवींद्र बिनवडे यांच्यासह महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आपत्कालीन कक्ष वाढविणार
दरम्यान, पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पायी चालत पुण्यात येतात. मात्र, या वर्षी पाऊस उशिरा येण्याची शक्यता आहे. तसेच जून महिन्यातही उन्हाची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी आपत्कालीन कक्ष वाढविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेकडून पालखी मार्गावर अशा कक्षांची संख्या आता वाढविली जाणार आहे.
पालखी कालावधीत 24 तास पाणी
दरम्यान, पालखी कालावधीत पालखी मुक्कामी असलेल्या भागात 24 तास पाण्यासह, पाण्याचे टॅंकरही उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. या शिवाय, पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास तातडीच्या दुरूस्तीसाठी स्वतंत्र पथकही नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या असून दिड्यांना आवश्यक तेवढे पाणी टॅंकरद्वरे देण्यास सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती पेठांमध्ये पाणी जादा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी जादा सीसीटीव्ही
पालखी मार्गावरील बेवारस वाहने उचलणार
मुक्कामाच्या ठिकाणी 24 तास वीज पुरवठा
मुक्कामाच्या ठिकाणी 24 तास स्वच्छता
शहरात सर्वत्र मोबाईल टॉयलेट
पालखी मार्गावर फिरत्या दवाखान्यांची सुविधा