सातारा -नागठाणे (ता. सातारा) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन चंद्रकांत पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात 84 लाख 41 हजार 913 रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेने सचिन पवार यास यापूर्वीच निलंबित केले आहे. पवार यांनी अपहार करुन शासकीय दस्ताऐवज नष्ट केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व कागदपत्रे नष्ट केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत.
नागठाणे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करावी, असे अनेक तक्रार अर्ज जिल्हा परिषद प्रशासनाकडे आले होते. याबाबत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. तत्कालिन ग्रामसेवक सचिन पवार यांनी बोगस पावती पुस्तके छापून त्याद्वारे गैरव्यवहार केल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. अनेक महत्वाची कागदपत्रे गहाळ असून अनेक कागदपत्रांमध्ये खाडाखोड असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीअंती पवार यास मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबित केले होते. ग्रामपंचायत निधीचा अपहार करुन मूळ दस्ताऐवजामध्ये खोट्या कागदपत्रांचा समावेश करुन फेरफार असल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश गौडा यांनी सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
या आदेशावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांचीही सही आहे. पवार यांनी गाळा डिपॉझिट 32 लाख 10 हजार, करवसुली 42 हजार 354 रुपये, कोविड भरणा 5 हजार 600, प्रमाणकाशिवाय खर्च 25 लाख 63 हजार 907, मूल्यांकनाशिवाय खर्च 12 लाख 36 हजार 225, कोटेशनशिवाय खर्च चार लाख 90 हजार 632 रुपये, रोखीने अदा 54 हजार 415, कमी जमा 55 हजार 350 रुपये, जादा जमा 14 हजार 430, दिसून न येत असलेली अनामत नोंदचे चार लाख 90 हजार असे 84 लाख 41 हजार 913 रुपयांचा अपहार केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर निलंबित ग्रामसेवक सचिन पवार याची भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 17 (अ) प्रमाणे चौकशी करावी. शासकीय दस्तऐवज गहाळ करणे, स्वत:च्या ताब्यात ठेवणे, चौकशीसाठी उपलब्ध न करणे आदी मुद्यांवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश विनय गौडा यांनी दिले आहेत.