पुणे –शहरातील विविध प्रकल्पाचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार आहेत. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्या आणि निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरूवात झाली. आता त्यावर हरकती-सूचना होती, आरक्षणे जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल आणि त्याक्षणी आचारसंहिताही लागू होईल.या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांनी जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेण्याला सुरूवात केली आहे.
याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत दीड हजार कोटी रुपयांचा जायकाचा प्रस्ताव आणि 300 कोटी रुपयांचा नदी सुशोभिकरणाचा प्रस्ताव यासह अन्य अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी आणले जाणार आहेत. या दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रस्तावांसह अन्य अनेक लहान प्रस्ताव मिळून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे हे प्रस्ताव आहेत.