उस्मानाबाद – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेद्वारे शिंदे गटासह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताहेत. त्यासोबतच अंधारे यांनी मागील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच काल झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या,’जिकडे हवा, तिकडे थवा, अशी सत्तार यांची स्थिती आहे. तसेच कुराण आणि इस्लामचा संदर्भ देत त्यांनी सत्तार यांना लक्ष्य केले. त्या पुढे म्हणाल्या, सर्व आमादारांनी हिंदुत्वासाठी बंड केले असेल तर मग कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कशासाठी बंड केले होते. सर्व आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. मात्र त्यावेळी सत्तार गेले नव्हते. अब्दुल सत्तार हिंदू असतील तर त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जायला हवे होते. जर ते मुस्लीम असतील आणि मुस्लीम धर्माचे ते पालन करत असतील तर आम्ही त्यांना इस्लामच्या भाषेत समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला.”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही हिंदुत्वामुळे बंड केले, असा दावा शिंदे गटातील आमदार करतात. सत्तार यांना या मुद्द्यावरूनही ठाकरे गटाकडून लक्ष्य केले जाते. या मुद्यावरून सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सत्तारांवर टीका केली आहे.