मुंबई – म्युकॉर्मायकोसीस या दुर्मीळ आणि बुरशीजन्य ( Black Fungus ) आजाराचा संसर्ग झाल्याने किमान आठ जण महाराष्ट्रात दगावले असून या आजारात मृत्यू दर 50 टक्के असून त्याचा परिणाम अंधत्व येण्यात होत असतो.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालयाचे प्रमुख असणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार,म्युकॉर्मायकोसीस हा आजार काळी बुरशी ( Black Fungus ) या नवानेही ओळखला जातो. त्याचे महाराष्ट्रात दोनशे बाधित आढळले आहेत. त्यातील आठ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ते करोनामुक्त झाले पण रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाल्यामुळे हा आजार त्यांच्या प्राणावर बेतला.
करोनाच्या साथीच्या आधी काळी बुरशी ( Black Fungus ) हा आजर दुर्मिळ मानला जात असे. त्यावेळी हा रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना अत्यंत नगण्य स्वरूपात तो होत असे. मात्र या साथीनंतर तो वेगाने वाढत आहे. त्याची तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे करोना, मधुमेह आणि स्टेरॉईडमुळे कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती.
करोनामुळे निर्माण झालेल्या शारीरिक गुंतागुंतीच्या प्रकरणात स्टेरॉईडचा वापर करावा लागतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तर काही औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते, असे लहाने यांनी स्पष्ट केले.