लसीकरणाची नोंदणी प्रकीयाच बदलावी लागेल : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

करोना संसर्गाविषयी वर्तमानपत्रांच्या प्रमुखांसोबत साधला वार्तालाप

नगर : करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया अडचणीची असल्याचे आता समोर येत आहे. ती बदलावीच लागेल. राज्य सरकारला स्वत:ची नवी प्रक्रीया आणण्याचा विचार करावाच लागेल, अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे व्यक्त केली.

करोनाचा संसर्ग आटोक्यात येण्याऐवजी नगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य सुविधांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे महसूलमंत्री थोरात यांनी प्रत्येक घटकासोबत चर्चा करुन वस्तुस्थिती व उपापयोजनांमधील त्रुटी जाणून घेण्याची मोहीम उघडली आहे. थोरात यांनी आज त्यासाठी नगरमधील सर्वच वर्तमानपत्रांचे संपादक व आवृत्तीप्रमुखांशी संवाद केला.

आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे, ब्लॉकचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, ज्ञानदेव वाफारे आदी यावेळी उपस्थित होते. लसीकरणासाठी नोंदणी करताना कोणत्याही शहरातील नागरीक दूरच्या गावांत पोचत आहेत. मग तेथील नागरीकांनी कुठे जायचे? असे पेच निर्माण झाले आहेत. त्यातही लस जिथे उपलब्ध असेल, त्या केंद्राचे ऑप्शन मिळत असल्याने नागरीक मिळेल तेथील सेंटरवर नावनोंदणी करत आहेत. परिणामी हा गोंधळ वाढत जाईल, असे चित्र असल्याने त्यात बदल करावा लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पुणे, नाशिकमधील नागरिक संगमनेरला…!

लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणीमुळे कोणत्याही गावातील नागरीक कोणत्याही लसीकरण केंद्रावर पोचत आहेत. आज संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे पुणे व नाशिक जिल्ह्यातील नागरीक लसीकरणासाठी आले होते. ऑनलाइन प्रक्रीयेत घुलेवाडी येथील केंद्रावर लस उपलब्ध असल्याचे दिसल्याने पुणे व नाशिकमधील लोक तिथे पोचले. एकतर बाहेरुन आल्याने हीच मोठी अडचण आहे. तसेच स्थानिकांची कुठे जायचे? असा नवा पेच निर्माण होत आहे. त्यामुळे ही प्रक्रीयेविषयी महसूलमंत्री थोरात यांनी चिंता व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.