तेल अवीव – हमास विरूध्द सुरू असलेल्या संघर्षात इस्त्रायलची भूमिका बदलणार नसल्याचे आता स्पष्ट होत चालले आहे. आम्ही आमच्याच पध्दतीने चालू आणि हमासच्या विरोधात उभे राहु असा संदेश इस्त्रायलने दिला आहे. इस्त्रायलने युध्द थांबवावे यासाठी त्यांच्यावर जागतिक समुदायाकडून दबाव टाकला जात असताना त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीच हे संकेत दिले आहेत. आमच्यावर आणखी दबाव आणला गेला तर आम्ही हमासच्या विरोधात एकटे उभे राहु असेही नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे.
इस्त्रायल या जगातल्या एकमेव यहुदी देशाचा पंतप्रधान म्हणून मी जेरूसलेम येथून ही शपथ घेतो की आमच्यावर दबाव आणला गेला तर आम्ही यापुढे एकटे लढू. अर्थात आम्ही एकटे नाही आणि जगातल्या अनेक शालीन लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. मात्र आम्ही नरसंहार करणाऱ्या शत्रुंचा पराभव करू असे नेतान्याहू यांनी गुरूवारी म्हटले आहे.
होलोकास्ट मेमोरिअल डेच्या आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले ८० वर्षांपूर्वी जेंव्हा नरसंहार झाला तेंव्हा यहुदींकडे बचावाचे कोणते साधन नव्हते. त्यावेळी एकही देश आमच्या मदतीसाठी पुढे आला नव्हता. आज आम्ही पुन्हा एकदा शत्रुंचा सामना करत आहोत. जगभरातील नेत्यांना मी सांगू इच्छीतो की कितीही दबाव आला, आंतरराष्ट्रीय मंचांचा कोणताही निर्णय इस्त्रायलला आत्मसंरक्षण करण्यापासून रोखू शकत नाही. आम्हाला एकटे राहावे लागले तर आम्ही एकटे राहु. गरज भासली तर बोटांच्या नखांनीही आम्ही लढू. आमच्याकडे नखांपेक्षाही चांगल्या अनेक बाबी आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कालच इस्त्रायलला इशारा दिला होता. गाझा पट्टीतील अखेरचे शहर असलेल्या रफाहवरील हल्ले इस्त्रायलने थांबवले नाहीत तर अमेरिका त्यांना शस्त्रास्त्रे देणे थांबवेल असे थेट वक्तव्य बायडेन यांनी काल केले होते. त्यानंतर आपला इरादा जाहीर करून इस्त्रायलने आम्ही अमेरिकेचेही ऐकणार नाही असे उत्तर दिले आहे.
इजिप्तच्या कैरो येथे इस्त्रायल आणि हमास यांच्यात युध्दबंदीबाबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर रफाहमधील लष्करी अभियान सुरूच ठेवण्याचा आपला मनोदय इस्त्रायलने व्यक्त केला आहे. रफाह सीमेवर इस्त्रायलकडून सैन्य तैनाती वाढवण्यात आली आहे. बायडेन यांच्या इशाऱ्यानंतर त्यांच्या लष्कराचे प्रवक्ते म्हणाले की आम्ही रफाहच्या संदर्भात जी योजना आखली आहे त्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे आमच्याकडे आहेत.