Supriya Sule : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर अज्ञात समाजकंटकाने शाईफेक केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला.
काऱ्हाटीतील एका शेती फार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारले जात असून, त्यापैकी एका फ्लेक्स वर काऱ्हाटी गावात शाई फेकण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची संवाद साधल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलत होत्या.
बॅनरवर झालेल्या शाईफेक बाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कोणी केली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हे जे केलंय ते चुकीचं आहे. कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाही फेकणं हे अतिशय चुकीचं आहे.
देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे मात्र तो दिलदार असला पाहिजे. लोकांना दम देणं ह्या गोष्टी महाराष्ट्रात शोभत नाहीत, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.