काही माहिती हवी असेल तर आपण पटकन गूगल वापरून इंटरनेटवर शोधतो. जवळचं औषधांचं दुकान म्हणा की एखाद्या ठिकाणची पर्यटनस्थळं, त्यासाठी गूगलवर अवलंबून राहायची आपल्याला सवय झाली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीला आलेल्या चॅटजीपीटीमुळे आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलणार का, हा प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत.
ओपन एआय या संस्थेचा चॅटजीपीटी हा संवाद करू शकणारा एआय प्रोग्राम आहे. तो आपला प्रश्न समजून योग्य ते उत्तर आपल्याला समजेल अशा भाषेत देतो. जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. आपल्या प्रश्नातले कळीचे शब्द तो घेतो आणि त्याच्याकडच्या संबंधित माहितीचं परिवर्तन (ट्रान्सफॉर्म) करून उत्तर निर्माण (जनरेट) करतो. त्यासाठी त्याला अनेक उदाहरणांचं ट्रेनिंग दिलेलं आहे. चॅटजीपीटीबरोबर आपण संवाद करू शकतो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजलं नाही किंवा पटलं नाही, तर आणखी प्रश्न विचारून समजून घेऊ शकतो. आपल्याकडची माहिती त्याच्याबरोबर ताडून पाहू शकतो. या संवादातून चॅटजीपीटी शिकतो, स्वत:ची चूक झाली असेल तर मान्य करतो आणि आपल्याला आपली चूक दाखवून देऊ शकतो.
ही संवादाची सोय गूगल सर्चमध्ये नाही. आपला एक सर्च आणि त्याचं उत्तर यावरून गूगल पुढचा सर्च सुधारू शकतो. पण आपल्याशी चर्चा करू शकत नाही. दोघांमधला हा फरक महत्त्वाचा आहे. पण त्याच वेळी गूगल सर्च आपल्याला अनेक पर्याय सुचवतो हे विसरून चालणार नाही. व्हिक्टोरिया सिटी यावर सर्च केल्यावर गूगलमध्ये वेगवेगळ्या राज्यातली आणि देशातली शहरं दिसतात. त्यातलं हवं ते आपण निवडून अधिक माहिती घेऊ शकतो. चॅटजीपीटी मात्र एकच पकडून उत्तर देतो. आपल्याला दुसऱ्या देशातलं शहर हवं असेल तर ते तपशील आपल्यालाच पुरवावे लागतात.
गूगल नियमितपणे इंटरनेटवर चक्कर टाकतो. चॅटजीपीटी स्वत:च्या डेटाबेसमधून माहिती घेऊन आपल्याला पुरवतो. त्यामुळे ताजी माहिती तिथे असेलच याची शाश्वती देता येत नाही. तसंच या डेटाबेसमध्ये एखाद्या विशिष्ट देशाची, विशिष्ट तंत्रज्ञानाची, विशिष्ट दृष्टिकोनातून दिलेली माहिती असू शकते. त्यात बायस किंवा पूर्वग्रह असू शकतो.
आज एआय मधलं बरंचसं संशोधन बायस कमी करण्यात होत आहे. अनुभवावरून शिकत जाणं हा एआयचा गुण आहे खरा. पण हे अनुभव चौफेर प्रकारचे असावेत, त्यातून चुकीची माहिती घेऊ नये, एकाच प्रकारची विचारसरणी पुढे येऊ नये याकडे तज्ज्ञांना लक्ष पुरवावं लागतं. चॅटजीपीटी जगातल्या अनेकांबरोबर संवाद करतो आहे. त्यातून तो काय शिकेल, त्यात कोणते बायस किती येतील हे आज अजून सांगता येत नाही.
चॅटजीपीटीची गुण वैशिष्ट्य गूगल आपल्या सर्चमध्ये समाविष्ट करेल अशी एक कुणकुण आहे. तसं झालं तर उत्तम होईल. आपल्याला दोन्हीचे फायदे एकातच मिळतील!