बॉलीवूड चित्रपटात अभिनयाच्या जोरावर स्थान मिळवण्याच्या प्रयत्न केलेल्या काही नायक-नायिकांनी लेखनातही ठसा उमटवला. अनेक नायिकांची पुस्तकं बेस्टसेलर ठरली आहेत. त्यांच्या लेखनकौशल्याचा वेध घेणारा खास लेख.
बॉलीवूडच्या बहुतांश चित्रपटांचे कथानक हे पुरुषप्रधान असते. शत्रूंविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नायकाभोवती पटकथा गुंफलेली असते. त्याचवेळी चित्रपटातील नायिकेच्या वाट्याला एक-दोन गाणी, दृश्य आणि क्लायमॅक्स एवढेच येते. त्यांना अभियनाची फारशी संधी दिली जात नाही. या स्थितीतही काही अपवादात्मक महिलाप्रधान चित्रपटांची निर्मिती झाली. नर्गिस, हेमा मालिनी, रेखा, शबाना आझमी, श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि अलीकडच्या काळात राणी मुखर्जी, विद्या बालन यांनी नायिकेला चित्रपटाचे नायकत्व मिळवून दिले. अभिनयात उंची गाठताना त्यांनी अन्य क्षेत्रातही दबदबा निर्माण केला.
बहुतांश कलाकार केवळ चित्रपटसृष्टीवर अवलंबून राहात नाही तर ते अन्य उपक्रमातही व्यग्र असतात. कोणाचा हॉटेल व्यवसाय असतो, कोणाचा मॉल तर कोणी रिअल इस्टेटमध्ये भागीदारी करतो. याशिवाय त्यांची आणखी एक बाजू आहे आणि ती म्हणजे लेखन क्षेत्र. अनेक नायक आणि नायिकांनी लेखनातूनही आपल्या प्रतिभेची छाप पाडली. याचा फायदा त्यांना चांगली पटकथा असलेल्या चित्रपटांची निवड करताना झाला.
बॉलीवूड चित्रपटात अभिनयाच्या जोरावर स्थान मिळवण्याच्या प्रयत्न केलेल्या काही नायिकांनी लेखनातही ठसा उमटवला. फावल्या वेळेत वाचन करणे आणि वृत्तपत्रांत व मासिकांत स्तंभलेखनही करतात. अनेक नायिकांची पुस्तकं बेस्टसेलर ठरली आहेत.
ट्विंकल खन्ना : या क्रमवारीत बॉलीवूडची नायिका ट्विंकल खन्नाचे नाव सुरुवातीला घ्यावे लागेल. दोन दशकांपासून चित्रपटांपासून दूर राहणारी ट्विकल खन्ना आज यशस्वी लेखिका, स्तंभलेखिका, इंटिरियर डिझायनर आणि निर्माती म्हणून ओळखली जाते. 2015 मध्ये तिने पहिले नॉन फिक्शन बुक “मिसेस फनिबोन्स’ लॉंच केले. हे पुस्तक बेस्टसेलर ठरले. ट्विंकलने या पुस्तकासाठी 2016 मध्ये “रेमंड क्रॉसवर्ल्ड बुक ऍवार्ड’ पटकावला.
सोनाली बेंद्रे : सरफरोश, दिलजले यासारख्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवणारी सोनाली बेंद्रेने लेखन कौशल्यातही चाहत्यांची वाहवा मिळवली. 2015 मध्ये “द मॉडर्न गुरूकुल : माय इक्सपेरिमेंट्स विथ पॅरेटिंग’ नावाचे पुस्तक लिहिले. याशिवाय सोनालीचे सोशल मीडियावर “सोनाली’ज बुक क्लब’ आहे. ती वाचकांशी पुस्तकांविषयी चर्चा करते. सोनालीने 2017 मध्ये बुक क्लब सुरू केले.
सोहा अली खान : पतौडी कुटुंबातील कन्या सोहा अली खानचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये झाले. सोहाने 2017 मध्ये “पेरील्स ऑफ बीईंग मॉडरेटली फेमस’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यामुळे तिला क्रॉसवर्ल्ड बुक ऍवार्डही मिळाला.
शिल्पा शेट्टी : योगा क्विन शिल्पा शेट्टीने 2018 मध्ये “द डेअरी ऑफ अ डेमेस्टिक दिवा’ नावाचे पुस्तक लिहिले. हे एक “कुक बुक’ आणि “डायट बुक’ आहे. या पुस्तकाच्या मदतीने आपण अनेक प्रकारचे कुकिंग मेथड शिकू शकता आणि संतुलित आहारही घेऊ शकता.
प्रियांका चोप्रा : प्रियांका चोप्राने पहिल्यांदा 2009 मध्ये हिंदुस्थान टाइम्ससाठी स्तंभलेखन सुरू केले. याशिवाय तिने द टाइम्स ऑफ इंडिया, द गार्डियन आणि द न्यूयॉर्क टाइम्ससाठी देखील स्तंभलेखन केले. प्रियांकाने 2021 मध्ये आपले पहिले पुस्तक “अनफिनिशल्ड’ प्रकाशित केले. हे पुस्तक द न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीत सामील झाले.
करिना कपूर : करिना कपूरने 2021 मध्ये “प्रेग्नन्सी बायबल ः द अल्टिमेट मॅन्युअल फॉर मॉम्स टू बी’ नावाचे पुस्तक लिहिले. अर्थात हे पुस्तक लिहिण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली. या पुस्तकात गरोदरपणाच्या काळात मातांना 40 आठवड्यांतील आहार आणि फिटनेस तसेच सेल्फ केअरशी संबंधित गोष्टी सांगितल्या.
नीना गुप्ता : जाने भी दो यारो, खलनायक या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवणारी ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ताचे व्यक्तिमत्त्व नेहमीच
चर्चेत राहिले आहे. तिने आत्मचरित्र लिहिले असून “सच कहू तो: मेरी आत्मकथा’ मध्ये तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
अनु अग्रवाल : आशिकी चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अनु अग्रवाल ही लेखन आणि वाचनाबाबत उत्साही आहे. 2015 मध्ये अनु अग्रवालने Anusual : Memoir of a Girl Who Came Back from the Dead नावाचे पुस्तक लिहिले. त्यानंतर अनु अग्रवालने “अनयूजवल’ नावाचा ऑडिओ बुकदेखील प्रकाशित केला.
तिस्का चोप्रा : तारे जमीन पर या चित्रपटात आईची भूमिका करणारी तिस्का चोप्रा ही यशस्वी लेखिका होय. तिने 2014 मध्ये पहिले पुस्तक “ऍक्टिंग स्मार्ट : यूवर टिकीट टू शो बीझ’ प्रकाशित केले. 2021 मध्ये “व्हॉट्स अप विथ मी? पर्बर्टी, पिरीयड्स, पिंपल्स, पीपल्स, प्रॉब्लेम्स अँड मोअर’ हे पुस्तक लिहिले.
पूजा बेदी : 1990 च्या दशकात पूजा बेदीने बॉलीवूडमध्ये बोल्ड दृश्यावरून खळबळ उडवून दिली. तिचे चित्रपट फार चालले नाहीत. पण ती यशस्वी स्तंभलेखिका म्हणून ओळखली जाते. तिचे ब्लॉग नियमितपणे वाचणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहेत. तसेच ती रिऍलिटी शो मध्ये देखील दिसते. वर्तमानपत्रातील लेखनातून ती नाते संबंधाबरोबरच अन्य भावनिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.
नायिकांप्रमाणेच नायकदेखील पुस्तक लिहिण्यात मागे राहिले नाहीत. काहींनी मदतनीसच्या आधारे आत्मचरित्र लिहिले तर काहींनी नियमित लेखन करून अभिनयाबरोबरच लेखनातही हुकूमत गाजविली.
ऋषी कपूर : 1970 च्या दशकातील रोमॅंटिक नायक ऋषी कपूरने बॉलीवूडला एकाहून एक सरस चित्रपट दिले. सोशल मीडियावरदेखील ते सक्रिय होते आणि त्यांनी मांडलेल्या काही मतांवरून वादही निर्माण झाले. ऋषी कपूरचे “खुल्लम खुल्ला’ हे पुस्तक त्यांच्या कारकिर्दीतील चढउताराचे कथन करणारे आहे. या पुस्तकासाठी त्यांना दोन वर्षे लागली.
करण जोहर : दिग्दर्शक असण्याबरोबरच करण जोहर हा चांगला लेखकदेखील आहे. करण जोहरने विविध माध्यमातून लेखन केले असून त्यांनी आयुष्यातील काळोख मांडण्याबरोबरच चांगला काळही रेखाटला. “ऍन अनसुटेबल बॉय’ हे त्यांच्या पुस्तकाचे नाव.
आयुष्मान खुराणा : आयुष्मान खुराणामध्ये अभिनय कौशल्याबरोबरच गाण्यासाठी चांगला आवाजही आहे. नव्या पिढीतील लोकप्रिय नायक असणाऱ्या आयुष्मानने पुस्तकही लिहिले आहे. Cracking the Code: My Journey in Bollywood असे त्याचे पुस्तक आहे.
अनुपम खेर : 1980 च्या दशकांपासून अनुपम खेर हे सातत्याने चित्रपटांत काम करत आहेत. “सारांश ते द काश्मीर फाइल्स’ यादरम्यानचा त्यांचा मायानगरीतील प्रवास रंजक राहिला आहे. खेर यांचे अभिनय कौशल्य वाखण्याजोगे आहेच. अभिनयाचे धडे ते शाळा, महाविद्यालयातूनही देतात. त्यांनी लिहिलेले The Best Thing About You Is You! पुस्तक वाचनीय आहे.