भोर – अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुलीच्या पित्याने पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याकामी दलित संघटनाही चौकशीसाठी सरसावल्या असून, 1 ऑक्टोबरला भोर बंदची हाक दिली आहे.
भोर येथील आनंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या बारावी विज्ञान वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीस चोरीच्या मोबाइल प्रकरणात भोर पोलिसांनी 16 आणि 17 सप्टेंबरला घरी कोणी नसताना, महिला पोलीस कर्मचारी बरोबर न घेता सायंकाळच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये आणून तपासी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अटक करण्याची धमकी देत तिच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. संबंधित मुलीने घाबरून बुधवारी (दि. 18) आत्महत्या केली. पोलिसांनीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असून, त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी मयत मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. दरम्यान, मयत अल्पवयीन मुलीच्या तेरा वर्षांचा भाऊ मयूर संपत खुंटे याला पोलीस संरक्षणाची मागणी पोलीस निरिक्षक राजू मोरे यांच्याकडे केली आहे.
घटनेला 6 दिवस उलटून गेले तरी…
भोर पोलिसांनी अज्ञात मयत अशी नोंद केल्याने व पुढे कारवाई न केल्याने भोरमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, भिम आर्मी, रिपब्लिकन सेना आदी दलीत संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी याची चौकशी करुन संबंधित तपाशी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबीत करावे, अशी मागणी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली असून दि.1 ऑक्टोबरला भोर बंदचा इशारा दिला आहे.