पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या तरुणीने गुरुवार पेठेतील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे उघडकीस आल्याने खडक पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. अभिलाषा मित्तल ( २७ रा. वाशिम) असे या तरुणीचे नाव आहे.
अभिलाषा ही मागील महिन्यातच पुण्यात आली होती. सोमवारी सकाळी ती खोलीमध्ये एकटीच होती. तिने दरवाजा आतून बंद केला आणि गळफास लावून आत्महत्या केली. काहीवेळाने मैत्रिणीने दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान, खिडकीतून पाहिले असता घटना उघडकीस आली.
या प्रकरणी पोलिसांकडून बारकाईने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली. तर, तिच्या पालकांनी घातपाताच संशय व्यक्त करुन मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. तिचा हॉस्टेल मालकाशी वाद झाला होता, तसे तिने फोनवरुन सांगितले होते, असे पालकांनी सांगितले.