पिंपळे गुरव, (वार्ताहर) – जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटीतील नागरिकांनी नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी आज मोर्चा काढला. सांगवीतील पाण्याच्या टाकीपर्यंत निघालेल्या या मोर्चाच्या वेळी मधुबनमधील नागरिक सहभागी झाले होते.
दोन दिवसांपूर्वीच सोसायटीत पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाई करून येथील नागरिकांचे विद्युत पंप जप्त केले होते. दिवसाआड आणि त्यातही कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यांच्या तक्रारींची निवारण न झाल्यामुळे नाविलाज म्हणून पाण्याच्या नळाला विद्युत पंप लावण्याची नामुष्की आमच्यावर येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
जुनी सांगवी येथे एकूण दहा गल्ल्या असलेली ही मधुबन सोसायटी दाट लोकवस्तीची आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये लोकांची पाण्याची गरज पाहता महापालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची येथे तारांबळ उडत आहे.- गणेश ढोरे, अध्यक्ष, मधुबन मित्र मंडळ.
विद्युत पंपांवर केलेली कारवाई हे कायदेशीर आहे. आज आम्ही स्वतः चेक केले असता ग्राउंड लेव्हलला पाणीपुरवठा सुरळीत आहे. दुसर्या, तिसर्या मजल्यावर पाणी जात नाही. अशाच लोकांची ओरड आहे.- साकेत पावरा, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा.