सर्व महिला या आपल्या मैत्रिणी आहेत. दैनंदिन जीवनात आपण जो आनंद अनुभवतोय तोच आनंद समाजातील सर्व स्तरातील महिलांना मिळावा यासाठी कराड शहरातील आठ महिलांनी एकत्रित येत एका ग्रुपची निर्मिती केली. स्त्रीही देवाची अनमोल देणगी आहे जी सर्वत्र आनंद निर्माण करू शकते. त्यामुळे तिला बहरू द्या असा संदेश देत या ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. या ग्रुपचे नामकरण मेरी सहेली असे आहे.
संपूर्ण जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे ही तारीख जवळ आली की, अनेक संघटनांकडून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आठ या तारखेचा धागा पकडत कराड शहरातील आठ महिलांनी एकत्रित येऊन महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देता यावा यासाठी मेरी सहेली गुप्रची पाच वर्षांपूर्वी निर्मिती केली. डॉ. श्रृती शहा, जया सचदेव, रिना शहा, मुस्कान तरलेजा, संजना शहा, निकीता मेहता, वैशाली पालकर व प्राची शहा अशी या आठजणींची नावे आहेत.
प्रतिवर्षी आठ मार्चला या आठजणी एकत्रित येऊन स्वखर्चाने महिलांसाठी विविध उपक्रम राबवित असून या उपक्रमाची उंची वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. कराड शहरात काही वर्षांपूर्वी बारा महिलांनी एकत्रित येऊन महिलांसाठी सुयोग सुबोधिनी हा मंच सुरू केला होता. हा मंचही सलग पंधरा वर्षे सुरू होता. त्या माध्यमातून अनेक क्षेत्रांची पर्वणी महिलांना अनुभवायला मिळाली. मात्र कालांतराने हा ग्रुप बंद पडला. त्यामध्ये असणाऱ्या दोन महिलांच्या सूना व इतर महिलांनी त्यांचाच आदर्श घेत महिलांसाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेने मेरी सहेली ग्रुपची निर्मिती केली.
या ग्रुपची स्थापना 1 मार्च 2015 मध्ये झाली. ग्रुपमधील प्रत्येक महिला आपले घर सांभाळत हे काम करीत आहेत. आपले घर ही महत्त्वाची जबाबदारी त्या मानतात. त्यामुळे सध्यातरी प्रत्येक वर्षी एकच कार्यक्रम महिलांसाठी त्या घेत आहेत. मात्र या कार्यक्रमाची उंची इतकी मोठी असते. की, पुढचा कार्यक्रम कधी येतोय अशी महिलांना वाट पहावी लागते. आर्थिक स्थिती सर्वांचीच चांगली आहे. मात्र, पैसे असणारे सगळेच एक विचाराचे नसतात. आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद इतर महिलांनाही अनुभवता यावा या उद्देशाने काम करणारे काही थोडकेच असतात. त्यामध्ये या आठजणींचा समावेश करावा लागेल.
सर्व महिला या आमच्या मैत्रिणी आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करणे हेच आमचे ध्येय आहे या उद्देशाने त्यांनी आपल्या ग्रुपला मेरी सहेली असे नाव दिले. हा ग्रुप गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. या ग्रुपच्या वतीने फक्त महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. आजपर्यंत फ्लॉवर कॉम्पिटीशन, फॅशन शो, रांगोळी स्पर्धा, अक्षरसुधार स्पर्धा, डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याद्वारे महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जातात. एवढेच नव्हे तर उपस्थितांसाठीही ऑन दी स्पॉट गेम घेत त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन खुष करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय अंध मुलांचा व अपंग मुलांनाही व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी त्यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर गतवर्षी निर्भया पथकाद्वारे महिलांना मार्गदर्शन असे सामाजिक उपक्रमही राबविले जातात.
मेरी सहेली ग्रुपने आयोजित केलेल्या उपक्रमाचा कराड शहरातील अनेक महिला आस्वाद घेतात. संपूर्ण दिवसभर हे कार्यक्रम असल्याने याकाळात कोणत्यातरी वेगळ्या विश्वात गेल्याचा भास या महिलांना होतो. मेरी सहेली ग्रुपने सुरू केलेला हा उपक्रम इतर महिलांना प्रेरणादायी आहे. समाजातून आणखी अशा काही महिला पुढे येणे गरजेचे आहे.