#महिला_दिन_विशेष : लोकसहभागातून पारदर्शक कारभार :आशा भोंग, उपविभागीय वन अधिकारी

भोर उप वनविभागाच्या उपविभागीय वनअधिकारी आशा गौतम भोंग यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उच्चपदाला गवसणी घातली आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलगी स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम आली. त्यानंतर लोकसहभाग आणि प्रशासनातील दरी व्यापक करण्यात भोंग यांनी आपली सेवा चोखपणे बजावली आहे. वनसरंक्षकपदी नियुक्‍ती झाल्यानंतर त्यांनी जायकवाडी येथे “आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव’ आयोजित करून संपूर्ण जगासह प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

आपल्या कामाची चुणूक दाखवून त्यांनी वनविभाग आणि लोकसहभागातून संवाद वाढवला आणि गैरसमजांची दरी कमी केली. भोर येथील वनविभागात रूजू झाल्यानंतर त्यांनी तरूण, शेतकऱ्यांसाठी रोजगारवाटा निर्माण केल्या. तसेच वन्यप्राण्याच्या तस्करीला चाप लावला. भोंग यांनी भोर वनविभागात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामातून ठसा उमटविला आहे.

निमगाव-केतकी (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबात आशा भोंग यांचा जन्म झाला. त्यांनी निमगाव-केतकी येथेच प्राथमिक शिक्षण घेतले. मालोजीराजे शेती महाविद्यालय फलटण (जि. सातारा) येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथून वर्ष 2010 मध्ये कृषी शास्त्रामध्ये पदवी घेतली. अभ्यासात प्रचंड हुशार असलेल्या आशा भोंग यांनी प्रशासनात सेवा बजावण्याचे ध्येय उराशी बाळगले. मग त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नियोजनबद्ध अभ्यास, नोटस, अथक परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या बळावर त्यांनी वर्ष 2011 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदावर पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.

मात्र, पोलीस खात्यापेक्षा पक्षी, प्राणी, झाडांमध्ये मन जास्त रमते, हे जाणून त्यांनी पुन्हा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणादरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा 2012 परीक्षेत मागासवर्गीय मुलींमध्ये राज्यात प्रथम येऊन सहायक वनसंरक्षक (वर्ग 1) या पदावर त्यांची निवड झाली. राज्य वन अकादमी डेहराडून, उत्तराखंड येथील दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनतर औरंगाबाद वन्यजीव विभागात सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) पैठण या पदावर वर्ष 2014 मध्ये त्यांना नियुक्‍ती देण्यात आली. त्यावेळच्या कार्यकाळात भोंग यांनी जायकवाडी येथे “आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव’ आयोजित करण्यास सुरुवात केली. या महोत्सवातून त्यांनी संपूर्ण देशासह जगाचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनातील हा कार्यकाळ यशस्वी करून जून 2018 पासून त्या भोर येथील उप वन विभागात उपविभागीय वन अधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत.

आशा भोंग या सध्या भोर उप वनविभागात उपविभागीय वनअधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हे तालुके दुर्गम आणि डोंगरी आहेत. त्यामुळे रोजगारनिर्मितीसाठी स्थानिकांना अडथळे येतात. त्यावर मात करीत भोंग यांनी बांबू कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, वनउत्पादन व व्यवस्थापन केंद्र सुरु केले आहे. वन्यप्राणी शिकार प्रकरणाचा शोध घेऊन आरोपींना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शिकारीला बऱ्यापैकी अटकाव घालण्यात यश आले आहे. पर्यटन विकासांतर्गत किल्ले, विकासाची व वनउद्यान विकासकामांना चालना देण्यात भोंग यांनी पुढाकार घेऊन कामे केली आहेत.


भोर कार्यक्षेत्रात लक्षवेधी कार्य

भोंग यांची जून 2018 मध्ये भोर उप वनविभागामध्ये उपविभागीय वन अधिकारीपदी बदलीने पदस्थापना झाली. भोर उप वनविभागात त्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भोर उपवन विभागातील क्षेत्रांतील स्थानिक लोकांची बांबू या वनोपजावर असणारे अवलंबित्व ओळखून भाटघर-सांगवी येथे बांबू कौशल्य विकास केंद्र तयार केले. स्थानिक लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य वाढवून केलेले वनीकरणाची कामे, जल व मृदसंधारण कामे, वन्यजीवासाठी वनतळे बांधून वन्यजीवांसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहेत.

भोर उपवनविभागात असलेल्या जेजुरी, भोलावडे, जेजुरी, भांबवडे, किल्ले रोहिडेश्‍वर, रायरेश्‍वर, राजगड, तोरणा व बनेश्‍वर वन्यउद्याने व वनपर्यटन विकसित करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये होत असलेल्या वन्यप्राणीविषयक शिकार, वन्यप्राण्याची तस्करी, वनोपजीवी अवैध वाहतूक या बाबींवर वेळोवेळी कारवाई केली आहे. वेल्हे व सासवड वनपरीक्षेत्रात वन्यप्राण्यांची हत्या व अवयवांच्या तस्करीच्या गुन्हे कामाचा तपास करून आरोपीस मुद्देमालासहित अटक केली आहे. हे वनगुन्हे न्यायप्रविष्ट करण्यात आले आहेत.

वरिष्ठांकडून कौतुकाची थाप

आशा गौतम भोंग या वन्यजीव विभागाअंतर्गत औरंगाबाद येथे सहायक वनसंरक्षक पैठण येथे कार्यरत असताना वनविभागात केलेल्या कामांबाबत तत्कालीन सचिव (वने) महाराष्ट्र राज्य विकास खारगे (भा. प्र. से.) यांनी तसेच तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्‍चिम एम. के. राव (भा. व. से) यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रशंसा करून दखल घेतली आहे. भोंग या उपविभागीय वन अधिकारी भोर या पदावर कार्यरत असताना मुख्य वनसंरक्षक प्रा. पुणे विवेक खांडेकर यांनीही वेळोवेळी केलेल्या कामांबद्दल व नियोजनाबद्दल प्रशंसा केली आहे.

वनक्षेत्रातील स्थानिकांसाठी रोजगार वाटा
* भोर-वेल्हे आणि पुरंदर तालुक्‍यातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात काम करताना मागील वर्षी भाटघर येथील वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ वनविभागाच्या जागेत स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बांबू कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली आहे.
* नसरापूर येथे वन उत्पादन व व्यवस्थापन केंद्राची निर्मिती केली आहे.
* वन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुरंदर येथील वनक्षेत्रातील वन्यप्राणी शिकारीच्या प्रकरणाचा शोध घेऊन आरोपींना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
* भोर उपवन विभागांतर्गत पर्यटन विकासासाठी किल्ले विकास आराखड्याअंतर्गत पर्यटनविषयक कामे केली जात आहेत. वनउद्यान विकसित करून पर्यटनाला चालना देण्याचे काम सुरु आहे.
* वन्यजीव विभागाअंतर्गत वन व वन्यजीव संरक्षणाविषयी अनेक वनगुन्हे उघडकीस आणून न्यायप्रविष्ट केले आहेत.

शब्दांकन
भुजंगराव दाभाडे
दै. प्रभात प्रतिनिधी, भोर तालुका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.