पुण्यात 2 तर पिंपरी-चिंचवडमध्ये एक रुग्णालय उभारणार
पुणे – शहराबरोबरच ग्रामीण भागातील वाढती करोना रुग्णांची संख्या विचारात घेता तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शहरात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) आणि आरटीओ येथील एसएसपीएमएसच्या मैदानावर जम्बो हॉस्पिटल उभारले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी 1 हजार 600 बेड उपलब्ध होणार आहेत. यातील 1,200 हे ऑक्सिजन बेड तर 400 बेड हे आयसीयूचे असतील. दि.20 ऑगस्टपासून जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील करोना बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात दिले. त्यानुसार एका जम्बो हॉस्पिटलसाठी सीओईपी ग्राऊंडची जागा निश्चित करण्यात आली, तर उर्वरित दोन जागांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत होता. यातील एक जागा एसएसपीएमएस मैदानावर निश्चित करण्यात आली आहे. तर तिसरे हॉस्पिटल पिंपरी-चिंचवडमध्ये ऑटो क्लस्टर येथे होणार आहे.
येथील क्षमता 200 बेडची आहे. शहरातील दोन जम्बो हॉस्पिटलसाठी शनिवारी (दि.1) सकाळपर्यंत काम सुरू करण्याचे आदेश दिले जाणार आहे. दि.22 ऑगस्टपर्यंत हे दोन्ही हॉस्पिटल उभारण्याची मुदत ठरवून दिली आहे. मात्र, दि. 20 ऑगस्टपर्यंत हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे राव यांनी सांगितले.
लष्कराच्या रुग्णालयातही उपचार
कॅन्टोमेंन्ट परिसरातील करोनाबाधितांना लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घ्या, तसेच येथील डॉक्टर व इतर कर्मचारी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. त्यास अनुकूलता दर्शविण्यात आली आहे. मात्र, त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवनागी मिळाली नाही. लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला आहे.
ससूनची क्षमता वाढवणार
ससून हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड करोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ससूनमधील बेडच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 870 बेड हे करोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ पुरविले जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.