नवी दिल्ली : कॉंग्रेसला रामराम ठोकत ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांचे वडील आणि दिग्गज नेते दिवंगत माधवराव शिंदे यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवले. माधवराव 1996 मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांच्या जयंतीदिनीच ज्योतिरादित्य यांनी राजकीय खळबळ उडवणारे पाऊल उचलले.
कॉंग्रेसमधील प्रभावी नेते अशी माधवराव यांची नेहमीच ओळख राहिली. मात्र, कॉंग्रेसमध्ये दुर्लक्षिले जात असल्याची भावना बनल्यानंतर त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश विकास कॉंग्रेस हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला.
मात्र, काही काळानंतर ते स्वगृही परतले. आता ज्योतिरादित्य यांनीही अन्याय होत असल्याच्या भावनेतून कॉंग्रेसला रामराम ठोकला. मध्यप्रदेशात प्रदीर्घ कालावधीनंतर कॉंग्रेसला 2018 मध्ये सत्ता मिळाली.
त्यावेळी ज्योतिरादित्य हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, कॉंग्रेसने कमल नाथ यांच्या रूपाने जुन्याजाणत्या नेत्यावर धुरा सोपवली. तेव्हापासून ज्योतिरादित्य नाराज होते.
मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्यानंतर ज्योतिरादित्य यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बनवावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात होती. मात्र, त्याविषयीचा निर्णयही कॉंग्रेस श्रेष्ठींनी प्रलंबित ठेवला. त्यामुळे ज्योतिरादित्य यांच्या नाराजीत भर पडली अन् याआधीही ती अनेकदा चव्हाट्यावरही आली.