सरकारी रुग्णालयांना देताहेत बगल : चालकांचे लागेबांधे असल्याचा संशय
मंचर – येथील परिसरात रुग्णवाहिका चालकांचा मनमानी कारभार सुरू असून रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णास मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल न करता परस्पर खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहे. खासगी रुग्णालयातील मोठी बिले रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेत असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. यामध्ये खासगी रुग्णालयांचे व रुग्णवाहिका चालकांचे लागेबांधे असल्याचा संशय रुग्णांच्या नातवाईकांनी केला आहे.
मंचर-पुणे नाशिक महामार्गावर अनेकदा अपघात होतात. रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णास प्रथम मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यानंतर रुग्णाला तपासून पुढील उपचारासाठी कुठे पाठवायचे असे डॉक्टर सांगतात; मात्र गेल्या काही दिवसात मंचर परिसरात होत असलेल्या अपघातातील जखमी रुग्णांना स्थानिक रुग्णवाहिका चालक कुठलीही चौकशी न करता खासगी रुग्णालयात दाखल करत आहे.
खासगी रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णवाहिका चालक यांचे लागेबाधे असल्याने रुग्ण दाखल केल्यास त्या रुग्णामागे रुग्णवाहिका चालकांना कमिशन दिले जाते. यासाठी ही सर्व धावपळ केली जात असल्याचे जखमी रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. खरंतर अपघात होताच रुग्णांचे नातेवाईक यांची मनस्थिती वेगळी असते अनेक नातेवाईकांच्या खिशात पैसे नसतात. अशावेळी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टर अवाच्या सव्वा बिल करून रुग्णांच्या कुटुंबाकडून पैसे घेतात.
रुग्णावर उपचार केले असल्याने रुग्णाचे कुटुंबीय खिशात पैसे नसले तरी मित्रपरिवार, पाहुणे यांच्याकडून पैसे गोळा करून डॉक्टरचे बिल जमा करतात. मात्र यामध्ये त्यांना मोठ्या मासिक त्रास सहन करावा लागतो. याचा विचार हे रुग्णवाहिका चालक करत नाही. रुग्ण व त्याचे नातेवाईक यांचे काहीही होवो. आपले ठरलेले कमिशन कसे मिळेल. यावर मात्र त्याचे लक्ष असते. तसेच अनेक रुग्णवाहिका चालक रुग्णांस रुग्णालयात दाखल करण्याचे भाडे जास्त प्रमाणात आकारत असल्याच्या तक्रारी रुग्णाचे नातेवाईक करत आहेत.
न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
मंचर अवसरी फाटा येथे शुक्रवारी (दि. 7) एसटी अपघात झाला. त्यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. त्याच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात देखील उपचार झाले असते; मात्र केवळ कमिशन मिळणार म्हणून एका रुग्णवाहिका चालकाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णवाहिका चालकांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तालुका वैद्यकीय अधिकारी, मंचर नगरपंचायत, खासगी डॉक्टर मेडिकल असोशियन यांच्याशी पत्रव्यवहार करून दाद मागणार आहे. त्यांनी जर न्याय दिला नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सुरेखा निघोट यांनी दिला आहे.
काही रुग्णवाहिका चालक अत्यंत सेवाभावी काम चांगले करतात; परंतु काही रुग्णवाहिका चालक पाच ते दहा किलोमीटरवरून रुग्ण आणला तरी दीड ते दोन हजार रुपये भाडे घेतले जाते आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी, मंचर नगरपंचायत, तालुका खासगी डॉक्टर मेडिकल असोशियन यांनी रुग्णवाहिका चालकांना योग्य सूचना द्याव्यात. तसेच रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठीचे भाडे दरपत्रक मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर लावावे. तसेच खासगी रुग्णालयाच्या सकृत दर्शनी भागात लावावेत.
-सुरेखा निघोट, महिला आघाडी तालुकाप्रमुख शिवसेना