पुणे – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुषांषी संबंधित 13 ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी 14 कोटी 30 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून खर्च करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील एका शाळेत यात समावेश असणार असून शाळांची निवडही निश्चित झालेली आहे.
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास निधी मंजूर झाला असून त्यातून ऐतिहासिक गावांच्या शाळा विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसित करण्यास सांस्कृतिक कार्यंमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गाभा समितीने मान्यता प्रदान केलेली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 1, अमरावतीतील 3, कोल्हापूरमधील 1, नाशिकमधील 1, पुण्यातील 1, रत्नागरीतील 2, सांगलीतील 2, साताऱ्यातील 2 या प्रमाणे एकुण 13 शाळा विकसित होणार आहेत. महात्मा ज्योतिबा फूले-ज्योती सावित्री इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळा (खानवडी, ता.पुरंदर, जि.पुणे), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (चोंडी, ता.जामखेड, जि.अहमदनगर), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज- जिल्हा परिषद शाळा (मोझरी, ता.तिवसा, जि.अमरावती), संत गाडगेबाबा-जिल्हा परिषद शाळा (शेंडगाव, ता.अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती), शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(पापळ, ता.नांदगाव खंडेश्चर, जि. अमरावती).
वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज – जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 (पिंपळगाव-बसवंत, ता.निफाड, जि.नाशिक), राजर्षी शाहू महाराज- जिल्हा परिषद शाळा हिन्दुराव घाडगे विद्या मंदिर (कागल, जि.कोल्हापूर), महर्षि धोंडो केशव कर्वे-जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा (मुरुड, जि.रत्नागिरी), लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1 (वाटेगाव, ता.वाळवा, जि.सांगली), क्रांतीसिंह नाना पाटील-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (येडे मच्छिंद्र, ता.वाळवा, जि.सांगली), भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर- प्रतापसिंह हायस्कूल (सातारा), सावित्रीबाई फुले- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (नायगाव, ता.खंडाळा, जि.सातारा), साने गुरुजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (पालगड, ता.दापोली, जि.रत्नागिरी) याप्रमाणे महापुरुषांशी संबंधित गावातील शाळांचा विकास होणार आहे.