पुणे – जंगल किंवा वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्गांवर प्राणी येतात आणि वाहनांखाली सापडून त्यांना जीव गमवावा लागतो, अशावेळी केवळ जनावरांनाच नव्हे तर माणसांचाही त्यांना वाचवण्याच्या नादात जीव जातो. हे टाळण्यासाठी सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला “बाहुबली कुंपण’ लावण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर दरवर्षी किमान पाचशे जनावरांचा मृत्यू होतो. याशिवाय या जनावरांना वाचवताना अनेक वाहनांचे अपघात होतात ही बाब आणखी वेगळी आहे. हे होऊ नये, यासाठी गडकरी यांनी ही शक्कल लढवली आहे. अमृतसर-जामनगर आर्थिक कॉरिडॉरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हे सहा-लेन ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे असणार आहे. यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 50 टक्के कमी होईल. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात तेलंगणातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, वारंगलमधील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, नागपूर-विजयवाडा कॉरिडॉर, मंचेरियल-वारंगल विभाग, एनएच 563 च्या करीमनगर-वारंगल विभागाचे अपग्रेडेशन करणे आणि तेलंगणात पाच हजार 590 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी मोदी यांनी केली आहे.
याशिवाय ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे 10 हजार किमी पर्यंत विस्तारण्यासाठी साडेचार लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा गडकरी यांनी केली आहे. हे प्रकल्प पूर्ण करताना त्यात हे बाहुबली कुंपणही लावण्यात येणार आहे. सध्या ते नॅशनल हायवे 30 (उत्तराखंड) वर लावण्यात येणार आहे.
बाहुबली हे नाव का?
या कुंपणाची उंची किमान 1.20 मीटर असणार आहे. बांबूचा वापर करून हे कुंपण बांधले जाणार असून, ते पूर्णपणे प्रभावी आणि पर्यावरणपूरक असल्याचा गडकरींचा दावा आहे. बांबूला क्रियोसोट तेलाने प्रक्रिया केली जाईल आणि नंतर त्यावर एका विशिष्ट पद्धतीचे लेपन केले जाईल यामुळे ते स्टीलला एक मजबूत पर्याय असेल. या कुंपणाला वर्ग-1 चे फायर रेटिंग आहे, हे अतिशय सुरक्षित असून, आत्मनिर्भर भारत या तत्त्वांशी ते सुसंगत असेल. बांबू ही नैसर्गिकरित्या मजबूत वस्तू आहे, परंतु क्रियोसोट तेलाची प्रक्रिया करून ते अधिक मजबूत केले जाऊ शकते. क्रेओसोट तेल तेलकट द्रव स्वरूपातील उत्पादन आहे जे “कोळसा टार डिस्टिलेशन’चे उपउत्पादन आहे. हे एक चांगले संरक्षक आहे आणि बांबूला सडण्यापासून आणि कुजण्यापासून वाचवण्यास मदत करू शकते.