फलटण -प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते येथे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संबंधित अधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत. याअंतर्गत अद्यापपर्यंत 1 लाख 54 हजार 965 नोंदी तपासण्यात आल्या असून 888 कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
दरम्यान, आज कुणबी प्रमाणपत्र देण्याचा प्रारंभ सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला. पहिला कुणबी दाखला मयूर मधूकर अलगुडे (रा. घाडगेवाडी) यांना देण्यात आला. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार संजीवनी बोबडे (सावंत), तुषार देशमुख आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली. या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासणीची कार्यवाही सुरू आहे. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंदपत्रक, कोतवाल बुक नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असून शनिवार दि. 18 नोव्हेंबरपर्यंत फलटण तालुक्यामध्ये तहसील कार्यालयात एकूण 1 लाख 24 हजार 29 नोंदी तपासण्यात आल्या.
त्यात कुणबी जातीच्या 888 नोंदी आढळल्या. तर दुय्यम निबंधक कार्यालयात 30936 नोंदी तपासल्या असून एकही नोंद आढळून आलेली नसल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली. या कामाला गती मिळण्यासाठी व समन्वयासाठी तहसील कार्यालयात विशेष कक्ष स्थापण्यात आला असून महसूली अभिलेख, शिक्षण विभाग, इतर शासकीय विभागाकडील अभिलेख वगळता कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी जातीचे अभिलेख किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी विशेष कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.