जुन्नरमधील सर्वाधिक उंचीवर असलेले धार्मिक क्षेत्र
जुन्नर – जुन्नर तालुक्याला निसर्गाने भरभरून योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन तालुका असा मान जुन्नरला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी अशी जगामध्ये ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यात अनेक निसर्गरम्य व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. हटकेश्वर त्यापैकीच एक.
श्रीक्षेत्र हटकेश्वर जुन्नरमधील सर्वाधिक उंचीवर असलेले धार्मिक क्षेत्र, येथे जाण्यासाठी अलदरे, गोद्रे तसेच आलमे या गावामधून जाता येते. सर्वात जवळचा मार्ग गोद्रे गावामधून जातो. आदिवासी भागातील गोद्रे गावाच्या डोंगरावर हटकेश्वर मंदिर असून या मंदिराची महती अनेक धार्मिक ग्रंथात आहे. नवनाथ ग्रंथामध्ये हटकेश्वर असलेल्या डोंगरास सोन्याचा डोंगर म्हटले आहे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. हजारो भाविक व पर्यटक दर्शनासाठी श्री हटकेश्वराच्या दर्शनासाठी येतात. येथून लेण्याद्री, शिवनेरी, चावंड त्याचप्रमाणे वडज, माणिकडोह, येडगाव व पिंपळगाव जोगा धरण, डोंगररांगाचे रमणीय दृश्य नजरेस पडते.
तेथे पोहोचण्यासाठी पायपीट करून थोडी विश्रांती व मजलदरमजल करीत जावे लागते. हटकेश्वरच्या दर्शनास जाणे म्हणजे तुमच्या शारीरिक क्षमतेची परीक्षाच असते. डोंगरावरील विस्तीर्ण पठार तसेच मोठ्या शिळा अचंबित करतात. या वाटेवर कुणा अज्ञात भक्ताने पिंड व नंदीची स्थापना केल्याचे दिसून येते. साधारणत दीड ते 2 तासांच्या चढाईंनंतर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर विविध रंगाच्या फुलांची झालेली उधळण व दाट धुके जणू स्वर्गात असल्याचा भास निर्माण करतात.
दोन विवर, एवढ्या उंचीवर असलेल्या पाषाणात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. श्रावणात तसेच महाशिवरात्रीला हजारो भाविक हटकेश्वराच्या दर्शनाला येतात. मंदिरासमोर शेकडो नंदी व शिवपिंडी भाविकांनी अर्पण केलेले दिसून येतात. मनोकामना पूर्ण झालेले भाविक नंदी आणि पिंडी अर्पण करीत असल्याची माहिती येथे असलेल्या स्थानिक आजोबांनी दिली.
हटकेश्वरला कसे जावे
* नारायणगावावरून जुन्नरला यावे. त्यानंतर गोद्रे किंवा आलमे.
* कल्याणवरून माळशेज घाट, पारगाव फाटा, गणेश खिंडमार्गे गोद्रे.
* नगरवरून ओतूर, बनकरफाटामार्गे आलमे.