वृत्तसंस्था – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या तिसऱ्या टप्याची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबविण्याची वेळ आली आहे. भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन याशिवाय स्पुतनिक-व्ही ही लस दिल्या जात आहे. यासंदर्भात माहिती देताना ‘स्पुतनिक-व्ही’ लसीची निर्मिती ऑगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता असल्याचीही शक्यता रशियातील भारताचे राजदूत डी.बाला व्यंकटेश वर्मा वर्तविली आहे.
याविषयी माहिती देताना डी.बाला व्यंकटेश वर्मा म्हणाले की, भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीचे एकूण ३० लाख डोस आयात होणार आहेत. तर जूनपर्यंत ५० लाख डोस आयात केले जातील असा दावा करत त्यांनी या लसीची निर्मिती ऑगस्ट महिन्यापासून भारतातच होण्याची शक्यता वर्तविली आहे.
डॉ. रेड्डीजने स्पुटनिक V लस भारतामध्ये आणण्यासाठी ‘रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड’ यांच्यासोबत करार केला आहे. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस दिली जात आहे. आता या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाच्या मोहीमेला वेग येणार आहे. भारतात ८५ कोटींहून अधिक स्पुतनिक-व्ही लसीची निर्मिती करण्याची योजना आहे. सध्या देशात दोन टप्प्यात एकूण २ लाख १० हजार लसीचे डोस रशियातून आले आहेत. भारताने १२ एप्रिल रोजी रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.