पुणे – धनकवडीमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना घोष(35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संबंधीत महिला रमेश शेलार यांच्या खोलीत भाड्याने रहाण्यास आली होती. ती सात ते आठ महिण्यापासून येथे एकटीच रहात होती. शनिवारी सकाळी शेजारच्या व्यक्तींना ती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली.
घटनास्थळी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते. त्यांनी घराची पहाणी केली असता, कल्पना घोष हीचा गळा चिरला गेल्याने तीचा मृत्यू झाल्याचे आढळले. तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेने धनकवडीमध्ये खळबळ माजली होती.
कल्पना घोष ही एकटीच रहात होती. तीच्या घरामध्ये पोलिसांना ओळख पटेल अशी इतर कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. ती उदरनिर्वासाठी काय काम धंदा करत होती, याची कल्पना शेजारच्यांना नाही. शनिवारी सकाळी तीचे शेजारी तीच्याकडे मोबाईलचा चार्जर घेण्यासाठी गेले असता, ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसल्याची माहिती उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.