पुणे -शहरात गल्ली-बोळांत कोयता गॅंगची दहशत, वाहनांची तोडफोड आणि अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीत वाढलेले प्रमाण गंभीर बनत चालले आहे. गुन्हेगार पोलिसांनाच आव्हान देत आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांशी चार हात करण्यासाठी अडीचशे पोलिसांना कमांडोच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षित सशस्त्र कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांनी मागील तीन वर्षांत सव्वाशे टोळ्यांवर “मोक्का’ कारवाई केली. या टोळ्या कारागृहात असतानाही शहरात गुंडांचा धुडगूस सुरू आहे. शिवाय, दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचाऱ्यांना लुटण्याचा सपाटा लावला आहे. दागिने, मोबाइल हिसकावण्याचे प्रमाण मोठे आहे. हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी हे पथक गस्तीसाठी नेमण्याचा निर्णय घेतला आहे
सीआर मोबाइल व्हॅन होणार अद्यावत पोलीस ठाण्यात गस्तीसाठी असलेली सीआर मोबाइल व्हॅन तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात येणार आहे. कामाचा ताण असणाऱ्या पोलीस ठाण्यात अशा दोन व्हॅन कार्यरत असतील.
संवेदनशील ठिकाणे, गुन्हेगारीचे हॉटस्पॉट तेथे ही व्हॅन गस्तीवर असेल. 112 या पोलीस हेल्पलाइनचे नियंत्रण मुंबईहून होते. तेथे कॉल गेल्यानंतर तो कोणत्या शहरातील आहे, हे पाहून तेथे वळविला जातो. मात्र, असेही काही कॉल स्थानिक पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय, थेट पोलीस अधिकाऱ्यांना येतात. त्या सर्व कॉलची येथे तत्काळ दखल घेतली जाणार आहे. जीपीएसद्वारे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे शहरात घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाचवेळी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच नियंत्रण कक्षाला कॉल केल्यानंतर मदत मिळण्यासाठी लागणारा कालावधी सुद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
शहरातील स्ट्रीट क्राइम कमी करण्यासाठी कमांडोच्या धर्तीवर प्रशिक्षण घेतलेले 250 कर्मचारी गस्तीसाठी तैनात असतील. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करणे आणि अघटीत घडल्यास तत्काळ घटनास्थळी धाव घेणे हे त्यांचे काम असणार आहे. यासाठी त्यांना 125 अत्याधुनिक वाहनेही देण्यात येणार आहेत. एका वाहनावर दोन कर्मचारी असतील. पोलीस ठाण्यातील गस्तीवरील नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच ते कार्यरत असतील.
– रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर