सेउल – दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यामधील संघर्ष काही नवा नाही. गेल्या दोन महिन्यांपासून या दोन देशांमध्ये किरकोळ प्रमाणात लष्करी संघर्षही सुरू झाला आहे. पण आता एक वेगळाच संघर्षाचा विषय या दोन देशांबाबत समोर आला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांनी काही वर्षांपूर्वी एक कुत्र्यांची जोडी दक्षिण कोरियाच्या सत्ताधाऱ्यांना भेट दिली होती. त्या कुत्र्यांच्या जोडीवरून दक्षिण कोरियामध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग याने 2018 मध्ये दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्रपती मून जे इन यांना पुंगसन ब्रीड या जातीच्या कुत्र्यांची जोडी भेट दिली होती. जेव्हा मुन यांचा कार्यकाल संपला तेव्हा या कुत्र्यांना घेऊन ते राष्ट्रपती भवनाबाहेर राहायला गेले. मे महिन्यामध्ये सुक येवल हे दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती बनले. तेव्हाही या कुत्र्यांची जोडी मुन यांच्याकडेच होती. मात्र आता मुन यांनी या कुत्र्यांना सांभाळण्यास असमर्थता दर्शवली आहे. कारण दक्षिण कोरियाने या कुत्र्यांना सांभाळण्यासाठी जो खर्च होतो तो देण्यास नकार दिला आहे.
दक्षिण कोरिया सरकारच्या नियमाप्रमाणे प्राण्यांचा खर्च चालवण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्राणी भत्ता दिला जातो. पण अशा प्रकारचा कोणताही भत्ता माजी राष्ट्रपती म्हणून मून यांना दिला जात नसल्याने त्यांनी या कुत्र्यांना सांभाळण्यास आपण असमर्थ असल्याचे कळवले आहे. विद्यमान राष्ट्रपती राजकारण करत असून त्यांच्याच पुढाकारामुळे कुत्र्यांना सांभाळण्याचा खर्च माजी राष्ट्रपतींना न देण्याचा निर्णय घेतला आहे असे मुन यांनी म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये या श्वानांबरोबर आमची भावना जुळली आहे. माझे सर्व कुटुंबीय या श्वानांवर प्रेम करत आहेत पण आता त्यांना आम्हाला सांभाळणे शक्य नाही म्हणून आम्ही पुन्हा त्यांना सरकारजमा करणार आहोत. आमच्यासाठी हा अतिशय अवघड निर्णय आहे पण विद्यमान राष्ट्रपतींच्या राजकारणामुळे आम्हाला हे करावे लागत आहे असे मुन यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी या विषयावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे अनधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.