राजकीय दबावच गांगुली यांना भोवला

ममतांविरुद्धचा चेहरा म्हणून वापर करण्याच्या प्रयत्नाचा दबाव

अमित डोंगरे 

पुणे -भारतीय संघाचे माजी कर्णधार व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना राजकीय दबावच भोवला. त्यांची प्रकृती ढासळण्याची जी काही कारणे असतील त्यात हे एक प्रमुख कारण असल्याचे धक्‍कादायक विधान बंगाल क्रिकेट संघटनेतील गांगुली यांचे निकटवर्तीय असलेल्या एका सदस्याने केले आहे.

आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी पक्षाचे नाव घेण्याचेही जरी टाळले असले तरीही तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याविरोधातील चेहरा म्हणून गांगुली यांना सादर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही या सदस्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी मार्क्‍सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनीही असेच विधान केले होते. त्यांचे गांगुली यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. अर्थात, संबंधित पक्षाने या दाव्याचे खंडन केले आहे. संघटनेतील सदस्यानेही त्यांचीच री ओढली आहे. 

येत्या एप्रिल व मे या कालावधीत पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यात ममतांना बाजूला करून गांगुली यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न एका राजकीय पक्षाने पाहिले असून त्यासाठीच हा सगळा अट्टहास सुरू आहे. गांगुली यांनीही राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्यावेळी असा कोणताही विचार नसल्याचे गांगुली यांनी सांगितले होते. राजकारण हे आपले क्षेत्र नाही. मी एक क्रिकेटपटू आहे आणि क्रिकेटचीच अविरत सेवा करता यावी यासाठीच आधी बंगाल क्रिकेट संघटना व आता बीसीसीआयच्या पदावर कार्यरत आहे. या खेळाचा विकास आणि प्रगती यांच्याशीच माझी बांधिलकी आहे, त्यामुळे राजकारण प्रवेशाचा कोणताही विचार नाही, असे गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. 

मात्र, तरीही त्यांना पश्‍चिम बंगालचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रेझेंट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्याचाच दबाव व प्रचंड दडपण गांगुलीवर होते. त्यांनी अनेकदा याबाबत आपल्या निकटवर्तीयांशी संवादही साधला होता. त्यांची प्रकृती ढासळण्याचे हे देखील एक कारण असू शकते, अशीही शक्‍यता या सदस्याने व्यक्त केली. गेल्या शनिवारी सकाळी जिममध्ये ट्रेडमीलवर व्यायाम करताना गांगुली यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना तातडीने वुडलॅण्ड्‌स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समोर आले होते.

 त्यांच्यावर तातडीने ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या मुख्य रक्‍तवाहिनीत 90 टक्के ब्लॉकेज असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यांची आणखी एकदा ऍन्जिओप्लास्टी करण्यात येणार असून त्यासाठी काही काळ थांबणार आहोत, असे मत रुग्णालयाच्या सीईओ रुपाली बासू यांनी व्यक्त केले होते. गांगुली यांच्यावर उपचार करण्यासाठी नऊ वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.

जमीनही काढून घेणार
2013 साली गांगुली यांना 2 एकर जमीन अत्यंत माफक किमतीत राज्य सरकारने शाळा बांधण्यासाठी दिली होती. मात्र, भाजपशी जवळीक वाढत चालल्याने ही जमीन परत घेण्याची प्रक्रियाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून सध्या सुरू झाली आहे. अर्थात, काही वर्षांपूर्वी खुद्द गांगुली यांनीच ही जमीन परत करण्याची तयारी दर्शवत एक अर्जही सरकारकडे सादर केला होता. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह गांगुली एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर ममता यांच्याशी असलेली त्यांची जवळीक जवळपास संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. गांगुली यांची ममता यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली असली तरीही त्यांच्यातील कटुता अद्याप कायम असल्याचेही सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.