Sourav Ganguly : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोबाईल घरातून चोरी झाला आहे. या प्रकरणी गांगुलीने ठाकूरपुकूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फोनची किंमत 1 लाख 60 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्याला पत्र लिहीत लवकरात लवकर फोन शोधण्याची विनंती गांगुलीने केली आहे.
घरात खूप शोधाशोध करूनही फोन सापडला नाही तेव्हा गांगुलीने पोलिसांची मदत घेतली आणि फोन शोधण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गांगुलीच्या मोबाईलमध्ये महत्वाची वैयक्तिक माहिती आहे. तसेच त्याचा मोबाईल बँकेशीही जोडलेला आहे. त्यामुळे गांगुली तणावात आहे. मोबाईल फोनमधील वैयक्तिक माहिती उघड होऊ नयेत यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती सौरभ गांगुलीने आपल्या पत्रात केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांगुलीचा फोन घरातून चोरीला गेला होता आणि त्यावेळी त्याच्या घरी पेंटिंगचे काम सुरू होते, अशा परिस्थितीत पोलीस घरात काम करणाऱ्या लोकांची चौकशी करू शकतात.