मुंबई – लॉकडाऊनच्या काळात पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मोठी मदत करून देशभर चर्चेत आलेला बॉलीवूडमधील अभिनेता सोनू सूद याने आता परत येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी नवीन ऍप काढले आहे.
प्रवासी रोजगार नावाने त्याने हे ऍप काढले असून त्यात गरजुंना त्वरित त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार पुरवला जाणार आहे असे त्याने म्हटले आहे. त्यांनी आज येथे बोलताना सांगितले की, बराच विचार केल्यानंतर आणि अनेकांशी बोलल्यानंतर मी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी आपण अनेक कंपन्यांशी बोललो असून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याची माहिती या ऍपवर देण्यात येत आहे.
केवळ मुंबईतच नव्हे तर देशाच्या अन्य भागातील स्थलांतरित मजुरांनाही या ऍपचा उपयोग होऊ शकेल असे त्याने म्हटले आहे. या ऍपवर देशाच्या विविध भागातील सुमारे पाचशे कंपन्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे असे त्याने म्हटले आहे. गरजू लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांना स्पोकन इंग्रजीचेही वर्ग सुरू करण्याची योजना असल्याचे त्याने सांगितले. या मजुरांच्या मदतीसाठी आपण नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोईमतूर अहमदाबाद आणि थिरुवनंतपुरम येथे चोवीस तास चालणारी हेल्पलाइनही सुरू केल्याची माहिती त्याने दिली.