इस्लामपूर – रूढी-परंपरा सोडून अनेक तरुण वाढदिवस साजरा करताना दिसतात. अनेकदा रस्त्यावर,बागेत, सार्वजनिक ठिकाणी केक कापलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसतात. आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. अनेक जण सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरे करतात. पण इस्लामपूर ( जि. सांगली) येथील विनोद शिवाजीराव मोहिते यांनी आईचा वाढदिवस साजरा करताना ८० वे रक्तदान केले अन् अनोख्या पद्धतीने साजरा केला.
कोरोना नंतर सांगली जिल्ह्यात रक्ताची टंचाई असताना इस्लामपूर येथील रक्तदान चळवळीचे कार्यकर्ते विनोद शिवाजीराव मोहिते यांनी ८० वे रक्तदान करून आईचा वाढदिवस साजरा केला.आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिनी अनेक जण वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. पण सध्याची कोरोना परिस्थिती अन् रक्तटंचाईला थोडा हातभार लावला.
सांगली जिल्ह्यात अनकेदा काही दिवस पुरेल एवढा रक्त साठा असतो. प्रशासन रक्तदानासाठी आवाहन करीत असते. याला प्रतिसाद म्हणून काही रक्तदान शिबिरे झाली आहेत.पण रोज रक्ताची मागणी वाढत आहे. विनोद मोहिते यांनी मंगळवारी राजारामबापू रक्तपेढीत कोरोनाची दक्षता घेत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
रक्त हे मानवी शरीरातच उपलब्ध होऊ शकते यामुळे सध्याच्या घडीला वेगवेगळ्या आजारांमध्ये रक्ताची तातडीची गरज आहे. कोरोना मुळे रक्त पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही.यामुळे रक्तदान ही काळाची गरज बनली आहे.
रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.पण कोरोनाच्या महामारीत रक्त दाते पुढे येत नव्हते. सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती सुधारत आहे. सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी असताना रक्तदान शिबीरे होत नव्हती. आतां काही प्रमाणात शिबीरे होत आहेत. यामुळे रक्त साठा उपलब्ध होत आहे.
एकीकडे कोरोनाची भीती आहे. दुसरीकडे आपली स्वतःची आरोग्याची काळजी यामुळे रक्तदान करण्यासाठी युवक पुढे येत नव्हते. पण अशा परिस्थितीत रक्तदान चळवळीसाठी नेहमी पुढाकार घेणारे विनोद मोहिते यांनी आज मंगळवारी ८० वे रक्तदान केले. वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यापासून ते रक्तदान करत आहेत. रक्तदान चळवळीतील योगदाना बाबत त्यांना केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवा मंत्रालयाचा नेहरू युवा पुरस्कार तसेच शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने श्री मोहिते यांचा गौरव केलेला आहे.
स्वतःच्या वाढदिनी, महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथीला रक्तदान केले आहे. वर्षातून चार वेळा रक्तदान करीत आपण समाजाचे ऋण फेडता आहोत अशी त्यांची भावना आहे. यांच्या निस्वार्थी दानामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे रक्तदान म्हणजेच जीवनदान ही उक्ती खरी ठरली आहे. कॉलेज जीवनात एनसीसीच्या माध्यमातून शिस्त आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली.आणि त्यातूनच वयाच्या आठराव्या वर्षापासून त्यांनी रक्तदान करायला सुरुवात केली.
वर्षाला चार वेळा रक्तदान करण्याची सवय जडली आहे. शहर आणि परिसरातील रक्तदानाची चळवळ रुजवण्यासाठी विनोद मोहिते नेहमीच प्रयत्नशील असतात. रक्तदानाबद्दल तरुणांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतात. समाजातील गरजू रुग्णांना देण्यासाठी आपण रक्तदाना पेक्षा आणखी मोठे काय देऊ शकतो. हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा एखाद्या गरजू पेशंटना रक्तदान करून त्यांना जीवदान देणे महत्त्वाचे आणि समाधान देणारे काम आहे.
रक्तदानाने जात-पात धर्म-पंथ हे भेद नाहीसे होतात. प्रत्येक तरुण- तरुणीने रक्त दानातून हे साध्य करायला हवे याठी विनोद मोहिते प्रयत्नशील आहेत. त्यांना रक्तदाता गौरव, रक्तदाता भूषण, युवा सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज मंगळवारी मोहिते यांनी त्यांच्या मातोश्री सेवानिवृत्त शिक्षिका सरोजिनी मोहिते यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.