पुणे – पुण्यामध्ये सलग दहाव्या वर्षी ‘सोलारीस करंडक’ जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे दि. ६ ते ११ जानेवारी या कालावधीत होणार आहे. आपापल्या काळातील राष्ट्रीय विजेते आणि देशातील विविध राज्यांमध्ये प्रशिक्षक असणारे दिग्गज् वरिष्ठ खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
तब्बल सव्वा सहा लाख रूपये पारितोषिक रक्कम असलेल्या या स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लब आणि ग्लोबल वरिष्ठ टेनिस संघटना (जीएसटीए) यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या भव्य स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लबच्यावतीने करण्यात आले असून स्पर्धेत सुमारे ३०० खेळाडू सहभागी होणार आहे, अशी माहिती सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांनी दिली.
ही स्पर्धा ३५ वर्षावरील, ४५ वर्षावरील, ५५ वर्षावरील, ६५ वर्षावरील आणि ७० वर्षावरील अशा पाच गटात होणार आहे. ही स्पर्धा एकेरी आणि दुहेरीमध्ये होणार आहे. जीएसटीए या संघटनेच्या मान्यतेखाली स्पर्धेचे आयोजन होत असून वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी पुण्यातील युवा खेळाडूंना मिळणार आहे.
स्पर्धेत महाराष्ट्रासह विशाखापट्टणम, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओरिसा, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. सोलारीस क्लब तर्फे सर्व खेळाडूंचे आदरतिथ्य मोफत करण्यात येणार असून त्यांना जेवण, नाश्ता यासह व्यायामशाळा आणि क्लबमधील इतर सवलतींचाही पुरेपुर लाभ घेता येणार आहे.
माजी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अव्वल मानांकित पुरूष गटातील मानांकित खेळाडू व पुण्यातील नितीन किर्तने, तसेच प्रशिक्षक रविंद्र पांड्ये, केतन धुमाळ, अजय कामत, अभिषेक ताम्हाणे, संदीप किर्तने, जयंत कढे, नीरज आनंद, नीलकंठ डाबरे तसेच नाशिकचे श्रीकांत पारेख असे मानांकित खेळाडू स्पर्धेत झुंझणार आहेत.