चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये अल्फा लवाल प्रा. लि. कंपनीच्या सी.एस.आर. उपक्रमातून 40 किलोवॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सायन्स पार्कमध्ये सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार अल्फा लवाल कंपनीच्या संबंधितांशी चर्चा करून सी.एस.आरच्या माध्यमातून सदर प्रकल्पास कंपनीची मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
यावेळी सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे, अल्फा लवाल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन, सी.एस.आर. व्यवस्थापक ललिता वासू, संपर्क अधिकारी देवेन्द्र बिराजदार, शिक्षण अधिकारी नंदकुमार कासार आदी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी सायन्स पार्क व अल्फा लवाल कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार करारानुसार अल्फा लवाल सौर ऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती करुन येत्या तीन वर्षापर्यंत प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारीही घेणार आहे. या प्रकल्पामुळे सायन्स पार्कला लागणारी बहुतांश वीजेची गरज भागणार आहे. तसेच वीजबीलापोटी होणाऱ्या प्रतिमहिना सुमारे 60 हजार रुपयांच्या खर्चात बचत होऊन सायन्स पार्क या स्वायत्त संस्थेस आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी सुमारे दोन लाख प्रेक्षक सायन्स पार्कला भेट देतात. या प्रेक्षकांनाही सौर ऊर्जा प्रकल्पाची यामुळे माहिती होईल.