एकूण मृत्यूंपैकी 92 टक्के चाळीशीपुढील रुग्ण
शून्य ते वीस वयोगटात एकही मृत्यू नाही
एकूण रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर दोन टक्क्यांहूनही कमी
पिंपरी – जून आणि जुलै महिन्यात करोनाचा कहर वाढतच चालला आहे. विशेषतः जुलै महिन्यामध्ये शहरात करोनामुळे रोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. असे असले तरी शहरातील मृत्यूदर हा अत्यल्प आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या आणि करोनामुळे झालेले मृत्यू पाहता हे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे, ही खूपच समाधानाची बाब आहे. आतापर्यंत शहरातील तीनशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक मृत्यू हे चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचे झाले आहेत.
शनिवार (दि. 25) पर्यंतची मृतांची आकडेवारी पाहिल्यास जवळपास 92 टक्के मृत्यू हे चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचे झाले आहेत. तर आठ टक्के मृत्यू 21 ते 40 वयोगटातील रुग्णांचे झाले आहे. शून्य ते 20 या वयोगटात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
शहरात करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे तब्बल 50.17 टक्के इतके आहे. त्या खालोखाल करोनाने 41 ते 60 वयोगटातील नागरिकांना लक्ष्य केले आहे. या वयोगटातील 117 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. टक्केवारीत हे प्रमाण 41.93 टक्के इतके आहे. तर, तुलनेत करोनामुळे चाळिशीच्या आतील रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच अत्यल्प म्हणजे केवळ 7.88 टक्के इतके आहे.
शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही तुलनेत चांगले आहे. आत्तापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे तर बरे होणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे, ही शहरासाठी दिलासादायक बाब असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.
मृतांमध्ये 1.79 टक्के तरुण
शनिवारपर्यंत चाळिशीच्या आतील 22 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. म्हणजे टक्केवारीत हे प्रमाण 7.88 टक्के इतके अत्यल्प आहे. शून्य ते 20 या वयोगटातील एकाचाही आत्तापर्यंत करोनाने मृत्यू झालेला नाही, ही बाब दिलासादायक आहे. 21 ते 30 या वयोगटातील केवळ पाच तरुणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. टक्केवारीत हे प्रमाण केवळ 1.79 टक्के इतके अत्यल्प आहे. 31 ते 40 वयोगटातील 17 रुग्ण दगावले आहेत. टक्केवारीत हे प्रमाण 6.09 टक्के इतके आहे.
पुरुषांचे प्रमाण 68.46 टक्के
करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण हे महिलांच्या तुलनेत जास्त आहे. शनिवारपर्यंत करोनामुळे 191 पुरुषांचा तर, 88 महिलांचा मृत्यू झाला आहे. पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण 68.46 टक्के तर, महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 31.54 टक्के इतके आहे.