पालकांचा सवाल : शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर ठिय्या
पुणे – करोना, लॉकडाऊनमुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शाळा अजूनही बंद आहेत. शाळांनी कोणत्याच सुुविधा दिलेल्या नसताना ऑनलाइन शिक्षणासाठी जादा शुल्क आकारणी केली आहे. फी बाबत पालकांना दिलासा देणारे आदेश शासनाने तात्काळ काढणे गरजेचे आहे.
याबरोबरच शाळांचे ताळेबंद जाहीर करावेत आणि शाळांच्या ऑडिटची तपासणी करावी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालकांनी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
आप पालक युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलनात स मुकुंद किर्दत, ललिता गायकवाड, संतोष राठोड, विक्रम गायकवाड, महमूद मणियार, सतीश यादव, सुहास पवार, डॉ. अभिजित मोरे, संदीप सोनावणे, विपिन मुनोत आदींचा समावेश होता.
खाजगी शाळांमध्ये “आरटीई’ अंतर्गत प्रवेश दिलेल्या गरीब व वंचित घटकांनतील मुलांना मोफत सुविधा दिल्याच पाहिजेत. नर्सरी, केजी, पूर्वप्राथमिक शाळांवर फी नियंत्रण आणावे व जिल्हा करोना मुक्त झाल्याशिवाय शाळा सुरु करु नका आदी मागण्या प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत.