सुधारित अंदाजानुसार रुग्णसंख्या 47 हजारांवर जाणार
600 आयसीयू बेडची कमतरता भासणार
600 विलगीकरण खाटाही कमी पडण्याची शक्यता
पुणे – शहरात अनलॉक-1 सुरू झाल्यानंतर करोना बाधितांचा आकडा दुपटीने वाढला आहे. परिणामी, रुग्णवाढीचा हाच दर कायम राहिल्यास जुलैअखेरीस पुण्यात एकूण रुग्णसंख्या 47 हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. यात 19 हजारांवर सक्रिय बाधित असण्याचा अंदाज आहे. तर, या करोना बाधितांवर उपचारासाठी पुण्यात तब्बल 1,200 बेड्सची कमतरता असेल. त्यात 400 आयसीयू बेड, तर 202 व्हेंटिलेटर्सची गरज असेल.
शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यानंतर 17 जूनपासून दररोज सापडणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा दुपटीने वाढला आहे. 15 जूनपर्यंतच्या रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन महापालिकेने जुलैमध्ये 40 हजार 906 एकूण बाधित अपेक्षित धरले होते. त्यात, सुमारे 18,406 सक्रिय बाधित असतील, असा अंदाज होता. मात्र, रुग्णसंख्या वाढीचा वेग लक्षता घेता, पालिकेने नवीन अंदाज निश्चित केला आहे. यानुसार, 31 जुलैअखेर शहरात 47,796 एकूण करोनाबाधित रुग्ण असतील. त्यात, 19,596 सक्रिय बाधित असतील. या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण वाढणार आहे.
प्रशासनाची धावपळ
महापालिकेच्या नव्या अंदाजानुसार, शहरात 31 जुलैअखेर 19,596 सक्रिय बाधितांसाठी 16,657 ऑक्सिजन सुविधा नसलेले बेड आवश्यक असतील. तर, ऑक्सिजनची सुविधा असलेले 1,960 बेड आवश्यक असतील. तर 980 आयसीयू बेड आणि 490 व्हेंटिलेटर्सची आवश्यकता असेल. मात्र, प्रत्यक्षात सध्या पालिकेच्या नियोजनानुसार, ऑक्सिजनची सुविधा नसलेले 614 बेड कमी पडणार आहेत. तर, 400 आयसीयू बेड आणि 202 व्हेंटिलेटर्स उपचारांसाठी लागणार आहेत. त्यासाठी धावपळ सुरू आहे.
शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आतापर्यंत 16 रुग्णालयांचे बेड महापालिकेने नियंत्रित केले आहेत. आता बाधितसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नवीन 20 रुग्णालयांची माहिती घेणे सुरू आहे. टप्प्याटप्प्याने हे बेड ताब्यात घेऊन प्रत्येक रुग्णाला बेड मिळतीत, याचे नियोजन सुरू आहे.
– शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका