कोलकाता – झोमॅटो या फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्मच्या कर्मचाऱ्याने कोलकात्याने झोमॅटोमधील चिनी गुंतवणुकीचा निषेध करण्यासाठी कंपनीचा टी- शर्ट फाडले आणि त्या टी-शर्टचे दहन केले. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी 15 जून रोजी केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे 20 जवान शहिद झाले. त्या घटनेनंतर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आणि चिनी गुंतवणुकीचा निषेध करण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावरून करण्यात आले. त्या आंदोलनाचा भाग म्हणून झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने झोमॅटोच्या टी-शर्टचे दहन केले.
कोलकात्याचे उपनगर असलेल्या बेहाला येथे शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी आपण झोमॅटोची नोकरी सोडत असल्याचीही घोषणा केली. झोमॅटोमध्ये चीनची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. नागरिकांनीही झोमॅटोच्या माध्यमातून अन्नपदार्थांची ऑर्डर देऊ नये, असे आवाहनही या कर्मचाऱ्यांनी केले.
2018 मध्ये चीनमधील अलीबाबा या ई कॉमर्स कंपनीचा भाग असलेल्या ऍन्ट फायनान्शियलने झोमॅटोमध्ये 14.7 टक्के समभागांची खरेदी करून 210 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. ऍन्ट फायनान्शियलने झोमॅटोमधील गुंतवणूक अलीकडेच 150 दशलक्ष डॉलरने वाढवली आहे. भारतीय बाजारपेठेच्या आधारे चिनी कंपन्या नफा कमवत आहेत आणि चीन भारतीय सैनिकांवर हल्ले करत आहे. चीन भारतीय भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. हे सहन केले जाणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले. चिनी गुंतवणूक असलेल्या कंपनीत काम करण्यापेक्षा आपण उपाशी राहण्यस तयार असल्याचे अन्य एका आंदोलकाने सांगितले.
मे महिन्यात करोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक मंदीमुळे झोमॅटोने आपल्या कर्मचाऱ्यांपैकी 13 टक्के कामगारांची म्हणजे 520 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.