नवी दिल्ली – शरद पवारांनी हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला, तर अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही? निवडणूक फॉर्मवर अजित पवारांची सही आहे, असा सवाल शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विचारला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, नेते जितेंद्र आव्हाड यांची देखील उपस्थिती होती.
तर अजित पवार गटाच्या नेत्यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली बुधवारी दिसली. निवडणूक आयोगात आपली बाजू मांडण्यासाठी शरद पवार गटाचा आजचा शेवटचा दिवस होता. यानंतर गुरुवारपासून अजित पवार गट आपली भूमिका मांडणार आहे.
यापूर्वी शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर खोटी कागदपत्र सादर करणे, राष्ट्रीय कार्यकारणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती देणे असे आरोप करण्यात आले होते. तसेच शरद पवार गटाच्या वतीने याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
यापूर्वी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोगात बरेच दिवस सुनावणी सुरू होती. आता त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याबाबतचा लढा निवडणूक आयोगात पोहचला आहे. त्यामुळे यावर सुनावणी घेण्यात येत आहे.
यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात पुरावे सादर करण्यात आले आहे. मात्र, अजित पवार गटाकडून सुमारे २० हजार बोगस शपथपत्रके दाखल करण्यात आल्याचा आरोप मागील सुनावणीमध्ये शरद पवार गटाने केला होता.