India tour of South Africa : पुढील महिन्यात भारतय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20, 3 एकदिवसीय तर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच त्यानंतरही काही मालिका होणार आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने बीसीसीआयकडे एक विनंती केली आहे, त्याने पुढील काही काळ टी-20 व एखदिवसीय सामन्यांतून विश्रांती मागितली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत तो खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो संघात परतेल, असेही वर्तवले जात आहे. कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
तर दुसरीकडे रोहित शर्माबाबत मात्र, संभ्रम कायम आहे. आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार किंवा नाही हे त्याने बीसीसीआयला अद्याप कळवलेले नाही. कोहलीने जसा निर्णय कळवला आहे तसा रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटबाबत अद्याप जाहीर केलेले नाही. तो सुद्धा कोहलीप्रमाणे सध्या लंडनमध्येच सुट्टीवर आहे. मात्र, तो टी-20 मालिकेत सहभागी झाला नाही तरी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात परतेल असे सांगितले जात आहे.
भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक…. (India tour of South Africa, 2023-24)
टी-20 मालिका….
पहिला सामना – 10 डिसेंबर, डर्बन
दुसरा सामना – 12 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग
एकदिवसीय मालिका…
पहिला सामना – 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरा सामना – 19 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 21 डिसेंबर, पार्ल
कसोटी मालिका…
पहिला सामना – 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरीयन
दुसरा सामना – 3 ते 7 जानेवारी, केपटाऊन
दरम्यान, राहुल द्रविड यांची मनधरणी करण्यात अखेर बीसीसीआयला यश आले आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीचा द्रविड यांच्याशी असलेला करार बीसीसीआयने वाढवला आहे. या कालावधीचा बीसीसीआयने स्पष्ट उल्लेख केला नसला तरीही आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून ते पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत द्रविडच या पदावर कायम राहतील असे संकेत दिले आहेत.